चक्रीवादळाच्या प्रभावाने धरणातील पाणीपातळी राखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:24 IST2021-06-01T04:24:24+5:302021-06-01T04:24:24+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात काही दिवस पावसाचा मुक्काम राहिल्याने, जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्प आणि ४६ लघुप्रकल्पातील ...

चक्रीवादळाच्या प्रभावाने धरणातील पाणीपातळी राखली
रत्नागिरी : जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात काही दिवस पावसाचा मुक्काम राहिल्याने, जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्प आणि ४६ लघुप्रकल्पातील पाण्याची पातळी गतवर्षीपेक्षा अधिक आहे. अर्जुना प्रकल्पाची पाण्याची पातळी मात्र, गतवर्षीपेक्षा कमी झाली आहे.
जिल्ह्यात नातूवाडी, अर्जुना आणि गडनदी असे तीन मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी नातूवाडी प्रकल्पाची पाणीसंचय करण्याची क्षमता २७.२३० दशलक्ष घनमीटर इतकी आहे. अर्जुना प्रकल्पाची पाणी संचय करण्याची क्षमता ७२.५६ दशलक्ष घनमीटर इतकी आहे, तर गडनदी प्रकल्पाची पाणीसंचय क्षमता ६४.४२ दशलक्ष घनमीटर इतकी आहे.
गेल्या वर्षी २८ मे रोजी नातूवाडी प्रकल्पातील पाणीसाठा १३.२४ दशलक्ष घनमीटर (४८.६२ टक्के) इतका होता. या वर्षी या दिवशी या पाणीसाठ्याची नोंद १४.११ दशलक्ष घनमीटर (५१.८५ टक्के) इतकी झाली आहे. गडनदी प्रकल्पातील पाणीसाठा ३२.७७ दशलक्ष घनमीटर इतका होता. या वर्षी या दिवशी ५३.७६ दशलक्ष घनमीटर इतकी झाली आहे. मात्र, अर्जुना प्रकल्पातील या वर्षीचा पाणीसाठा ५०.५० दशलक्ष घनमीटर इतका आहे. गतवर्षी या दिवशी ६८.४० दशलक्ष घनमीटर इतका होता. म्हणजेच अर्जुना प्रकल्पाची पाण्याची पातळी मात्र, गतवर्षीपेक्षा कमी झाली आहे. सध्या नातूवाडी प्रकल्पात ५१.८५ टक्के इतका पाणीसाठा आहे, तर अर्जुना प्रकल्पात ७० टक्के आणि गडनदी प्रकल्पात ८३ टक्के इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील ४६ लघुप्रकल्पांमधील पाण्याची पातळी तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे झालेल्या पावसाने वाढविली आहे. या सर्व धरणांमध्ये पाण्याचा एकूण संचय २१०.७६ दशलक्ष घनमीटर इतका आहे. सध्या या सर्व प्रकल्पांमध्ये एकूण ९२.१८ दशलक्ष घन मीटर (४३.७३ टक्के) इतका पाणीसाठा आहे. गतवर्षी हा पाणीसाठा ७८.२२ दशलक्ष घनमीटर (३७.११ टक्के) इतका होता.
जिल्ह्यात अजूनही अधूनमधून पाऊस पडत असल्याने, धरणसाठा अजूनही काही दिवस पुरेल, इतका आहे. त्यातच येत्या १० जूनपर्यंत मान्सून येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला जात आहे. मात्र, सध्या धरणातील पाणी संचय पाहता, यंदा पाण्याचा साठा गेल्या वर्षीपेक्षा अधिक आहे.
चौकट
मध्यम प्रकल्प सध्याचा पाणीसाठा(दशलक्ष घनमीटर) टक्केवारी गतवर्षीचा पाणीसाठा टक्केवारी
नातूवाडी १४.११ ५१.८५ १३.२४ ४८.६२
अर्जुना ५०.५० ७० ६८.४० ९४.२६
गडनदी ५३.७६ ८३ ३२.७७ ५०.८६