खेड : तालुक्यातील वरची हुंबरी येथील जगबुडी नदीपात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, प्रशासनाने कारवाई न केल्याने
ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी सायंकाळी ट्रॅक्टरद्वारे वाळू उपसा सुरू असल्याची माहिती समजताच ग्रामस्थांनी पोलीस पाटलांसमवेत घटनास्थळी धाव घेत महसूल विभागाला खबर दिली. मात्र, एकही अधिकारी न आल्याने वाळू उपसा करणाऱ्यांनी पळ काढला. यानंतर ग्रामस्थांनी नदीकाठी पहारा ठेवला असता पहाटे ट्रॅक्टर पुन्हा वाळू उपसण्यास आला असता ग्रामस्थांनी तलाठ्यास संपर्क केला, पण ते आले नाहीत. यानंतर पोलिसांना कळवल्यावर घटनास्थळी येऊन ट्रॅक्टर पोलीस स्थानकात जमा करतो, असे सांगत ट्रॅक्टर घेऊन गेले. मात्र, वरवली येथे पोहोचताच त्यांनी हुंबरी पोलीस पाटलांना हे काम आपले नसून महसूलचे असल्याचे सांगत हात झटकले. यामुळे मुद्देमालासह पकडलेला वाळूसाठा व उत्खनन करणाऱ्यांना पळून जाण्यास मुभा मिळाली. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर प्रशासन कामात व्यस्त असल्याचा फायदा घेत जगबुडी नदीपात्रात अनेक गावांत मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात असल्याचे पुढे येत आहे.
----------------------------
खेड तालुक्यातील हुंबरी येथे माेठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करण्यात येत असून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे़