रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीनेच लढण्याची भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पहिल्यापासूनची भूमिका आहे. मात्र, तरीही जिल्ह्यात काही ठिकाणचे स्थानिक पदाधिकारी स्वबळाचा उच्चार करत आहेत. आम्ही शांत आहोत, याचा अर्थ असा नाही की, आम्ही हतबल आहोत. जर कोणाला स्वबळावर लढण्याची खुमखुमी असेल, तर आम्ही धनुष्यबाण चालवून दाखवू शकतो, असा स्पष्ट इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला.रत्नागिरीत मंगळवारी एका पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपचे नाव न घेता जोरदार टोलेबाजी केली. त्यांचा रोख चिपळूणबाबत अधिक होता. स्थानिक पातळीवर जे ताेंड सोडले जात आहे, ते चुकीचे आहे. सिंधुदुर्गमध्ये मंत्री नितेश राणे यांनी महायुतीबाबत अतिशय संयमी प्रतिक्रिया दिली आहे. तेच सर्वांकडून अपेक्षित असते.मात्र, काही लोक सतत स्वबळाचा नारा देत आहेत. आमच्या शांत राहाण्याला कोणीही हतबलता समजू नये. जर कोणाला स्वबळावर लढण्याची खुमखुमी असेल, तर आम्ही धनुष्यबाण चालवून दाखवू शकतो. मात्र, महायुती व्हायला हवी, हीच आपली भूमिका आहे, असे ते म्हणाले. अर्थात, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये जे घडेल, तेच महायुतीबाबत रत्नागिरीत घडेल. तेथे शिंदेसेनेला मान मिळाला, तर रत्नागिरीतही मित्रपक्षांना तो मान दिला जाईल, असेही ते म्हणाले.
उद्धवसेनेच्या उपनेत्यावर टीकामुघलांना जसे प्रत्येक ठिकाणी संताजी धनाजी दिसत असत, तसेच आपल्याकडून तीन वेळा पराभूत झालेल्या उद्धवसेनेतील उपनेत्याला फक्त आपल्यावरच टीका करायला सुचते, असा टोलाही त्यांनी यावेळी कोणाचे नाव न घेता हाणला.
ही तर नौटंकीमतचोरी ही फक्त नौटंकी आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या पराभवाची कारणे सांगताना सामाजिक आणि सार्वजनिक कारणांमुळे आपला पराभव झाला असल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते. त्यांनी कोठेही मतचोरीचा मुद्दा काढला नव्हता. आताही इतर लोक मतचोरीबाबत बोलत असताना त्या पत्रकार परिषदेत बाळासाहेब थोरात गप्प होते. त्यामुळे आता होत असलेल्या मतचोरीच्या आरोपांवर बोलण्याची गरजच नाही, असे मंत्री सामंत म्हणाले.