सेना-भाजप युती असती तर...
By Admin | Updated: October 21, 2014 23:39 IST2014-10-21T21:38:26+5:302014-10-21T23:39:04+5:30
विधानसभा निवडणूक : हार-जीतनंतर आता चर्चांना उधाण, जिल्ह्यात दिसले असते वेगळे चित्र!

सेना-भाजप युती असती तर...
रत्नागिरी : आत्याला मिशा असत्या तर... ही म्हण कितीही उजळली गेली तरी कुठल्याही निवडणुका झाल्यानंतर ‘जर-तर’ची गणिते चर्चिली जातात. सरकारी कार्यालय असो, व्हॉटस् अॅपचा कट्टा असो किंवा पारावरच्या गप्पा असोत. जिकडे-तिकडे जर-तरच्या गप्पांना उत येतो. अशाच गप्पा आता शिवसेना-भाजप युतीशी संबंधित सुरू झाल्या आहेत. जर हे दोन पक्ष वेगळे झाले नसते तर महाराष्ट्रात आज वेगळेच चित्र बघायला मिळाले असते. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या दोन जागा राष्ट्रवादीने आपल्याकडे घेतल्या आहेत, त्याही युतीलाच मिळाल्या असत्या आणि रत्नागिरी जिल्ह्यात भगवा आणखीनच डौलाने फडकला असता, असाच सूर आता उमटत आहे.बंडखोरी झाली आणि जागा गमावली, असे चित्र जिल्ह्यात याआधीही पाहायला मिळाले आहे. काँग्रेसबाबत हा प्रकार अनेकदा पाहायला मिळाला आहे. मित्रपक्षाच्या उमेदवाराविरोधात अपक्ष म्हणून उभे राहण्याचा प्रकारही नवीन नाही. पण शिवसेना आणि भाजप हे अनेक वर्षांचे दोन मित्रपक्ष एकमेकांविरोधात उभे राहतील, असे अपेक्षितच नव्हते आणि या निवडणुकीत ते पाहायला मिळाले.जिल्ह्यातील सध्याच्या पाच मतदार संघांमधील रत्नागिरी आणि गुहागर या दोन जागा भाजपच्या वाट्याला येत होत्या. त्यामुळे भाजपची जी काही वाढ झाली ती या दोन मतदार संघांमध्येच झाली. इतर तालुक्यांमध्ये भाजप अस्तित्त्वात असली तरी ती फार मोठी नव्हती. या दोन जागांपैकी रत्नागिरीतील पक्षांतर सेनेच्या पथ्यावर पडले. पण गुहागर आणि दापोली या दोन जागा मात्र शिवसेनेला मिळवता आल्या नाहीत. जर शिवसेना-भाजप युती असती तर या चित्रात फरक पडला असता.दापोलीत राष्ट्रवादीचे संजय कदम ३ हजार २६४ मतांनी विजयी झाले. येथे भाजपच्या केदार साठे यांना १३ हजार ८७५ मते मिळाली. ही मते जर सेनेच्या सूर्यकांत दळवी यांना मिळाली असती तर काँग्रेस आघाडीपेक्षाही त्यांची मते अधिक होती. त्यामुळे येथे युतीचा विजयी सहज होता.गुहागर मतदार संघात राष्ट्रवादीच्या भास्कर जाधव यांनी एकहाती दणदणीत लढत दिली आहे. त्यांना ७२ हजार ५२५ मते मिळाली. गेल्या पाच वर्षात त्यांनी आपले मताधिक्य खूपच वाढवले आहे. भाजपचे डॉ. विनय नातू यांना ३९ हजार ७६१ आणि शिवसेनेच्या विजयकुमार भोसले यांना ३२ हजार ८२ मते मिळाली. म्हणजेच युतीची मते ७१ हजार ८४४ इतकी होत आहेत. जाधव यांची मते यापेक्षा अधिक आहेत. पण युती असती तर गुहागरमधील मते नक्कीच वाढली असती. त्यामुळे युतीला ही जागा मिळवण्याचीही संधी होती. अर्थात युती झाली नाही त्यामुळे शिवसेनेला पाचऐवजी तीन जागांवरच समाधान मानावे लागले आहे आणि भाजपला एकही जागा मिळालेली नाही. (प्रतिनिधी)
सामान्य कार्यकर्त्यांना युती हवी होती..
शिवसेना-भाजप युती तोडण्याचा निर्णय राज्यस्तरावर घेण्यात आला. मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना युती हवी होती. युती तोडण्याच्या निर्णयाबद्दल अनेकांनी नापसंती व्यक्त केली. मात्र पक्षाचा निर्णय मान्य करावा लागल्याने दोन्ही पक्षांना तोटा सहन करावा लागला आहे आणि त्याचे परिणाम दीर्घकाळ सोसावे लागणार आहेत.