साहित्यातूनच भारतीय संस्कृतीची ओळख
By Admin | Updated: October 18, 2015 23:58 IST2015-10-18T22:09:17+5:302015-10-18T23:58:08+5:30
कोमसापच्या जिल्हा संमेलनात नायगावकर यांचे प्रतिपादन

साहित्यातूनच भारतीय संस्कृतीची ओळख
रत्नागिरी : साहित्यामुळे इतिहास, जीवन व्यवस्था कळते. वसंत ऋतूच्या आगमनाबरोबरच भडकलेल्या तुरडाळीचे भाव हे वास्तव साहित्यातूनच समजते. शंभर - दीडशे वर्षापूर्वीचे मराठी भाषेतील साहित्य, वाङ्मय आजही वाचकांना वेड लावते. भारतीय संस्कृतीची ओळख साहित्यातून जगाला झाली आहे. मराठी युवकांना उद्योग व्यवसायाद्वारे भारतीयपणाचे वेड लावता आले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी केले.कोकण मराठी साहित्य परिषद व कवी केशवसूत स्मारक, मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाचे उद्घाटन अशोक नायगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, खासदार विनायक राऊत, कवी अरुण म्हात्रे, आमदार उदय सामंत, कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर, कार्याध्यक्ष नमिता कीर, कार्यवाह प्रशांत परांजपे, विश्वस्त अरुण नेरूरकर, भास्करराव शेट्ये, उर्मिला पवार, जिल्हाध्यक्ष सुरेश खटावकर, अण्णा राजवाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मारूती मंदिरपासून ढोलताशांच्या गजरामध्ये संमेलन स्थळापर्यंत दिंडी काढण्यात आली. प्र. ल. मयेकर व्यासपीठावर संमेलनाचा शुभारंभ झाला. प्रास्ताविक केंद्रीय कार्याध्यक्षा नमिता कीर यांनी केले. स्वागताध्यक्ष खासदार विनायक राऊत यांनी शारदोत्सवात आयोजित साहित्य संमेलन हा दुग्धशर्करा योग आहे, असे सांगितले. आमदार उदय सामंत यांनी सांगितले की, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून सादर केलेला प्रस्ताव केंद्र शासनाकडे पडून असल्याची खंत व्यक्त केली. साहित्याला राजाश्रयाची गरज आहे, तो राजाश्रय खासदार राऊत यांच्यामुळे मिळेल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली. पुढील वर्षी रत्नागिरीमध्ये राज्यातील पहिले विद्यार्थी साहित्य संमेलन घेण्यात येईल, असे आश्वासन आमदार सामंत यांनी दिले.
केंद्रीय अध्यक्ष महेश केळुसकर यांनी सांगितले की, कोमसाप हे कोकणातील साहित्यिकांचे हक्काचे व्यासपीठ आहे. कोमसापद्वारे तिसरी पिढी सक्रिय होत आहे. कोमसापद्वारे देवरूख येथे लवकरच युवा संमेलन होणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना जाहीर केले. कोकण रेल्वेला ‘तुतारी एक्स्प्रेस’ नाव देण्याची कोमसापची जुनी मागणी असून, त्याची पूर्तता खासदार राऊत यांनी करावी, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुहागर शाखेने प्रसिद्ध केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्याचबरोबर उपस्थित मान्यवर व ज्येष्ठ साहित्यिकांचा सत्कार करण्यात आला. दीप्ती कानविंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. चंद्रमोहन देसाई यांनी उपस्थितांचे आभार मानले. (प्रतिनिधी)