आयडियाची कल्पना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:32 IST2021-05-08T04:32:40+5:302021-05-08T04:32:40+5:30
पाय मोकळे करण्यासाठी आम्ही पोलिसांच्या नजरा चुकवत चुकवत, पटांगणात कोपऱ्यात असलेल्या एका सिमेंटच्या बाकड्यावर येऊन बसलो होतो. या लॉकडाऊनमुळे ...

आयडियाची कल्पना
पाय मोकळे करण्यासाठी आम्ही पोलिसांच्या नजरा चुकवत चुकवत, पटांगणात कोपऱ्यात असलेल्या एका सिमेंटच्या बाकड्यावर येऊन बसलो होतो. या लॉकडाऊनमुळे आपल्याला कुठे जाता येत नाही अन् कोणाला आपल्याकडे येता येत नाही. लस घेतल्याशिवाय काही करता येत नाही. अशा अवस्थेमध्ये आम्ही होतो. तेवढ्यात विजारीच्या खिशात हात घालून बंडोपंत आमच्यासमोर साक्षात देवासारखे उभे राहिले. आम्ही उसने हसून म्हणालो, ‘बंडोपंत आज इकडे कसं काय?’ तसे बंडोपंत म्हणाले, ‘तुमच्या घरी गेलेलो़, तर अंगणात कोणीच दिसलं नाही, म्हणून सरळ इकडे आलो. तेवढ्यात पोलीसदादा भेटले. म्हणाले, ‘निघाला कुठे?’ तर म्हणालो, ‘शतपावली करायला निघालो.’ तसे ते म्हणाले, ‘जेवला की काय? एवढ्या लवकर?’ मग माझ्या लक्षात आलं की, जेवल्यावर शतपावली करतात, तर जेवणापूर्वी सहस्त्र पावली करतात. असो. हे महत्त्वाचं नाही. तुमच्या मनात काय? चाललंय सांगा?’ तसे आम्ही म्हणालो, ‘दोन प्रश्न आहेत, एक लस घ्यावी की न घ्यावी आणि दिवसातला काही काळ माझा मोबाइल कुठे तरी गायब होतो.’ तसे बंडोपंत हसून म्हणाले, ‘अगदी सोपं आहे राव! लस घ्यायची की नाही आपल्या मनावर आहे. तुमच्या घरात टी़व्ही़ नसेल, तुमच्याकडे मोबाइल नसेल, तर लस घ्यायला काहीच हरकत नाही. तुमच्याकडे या दोन्ही गोष्टी असतील, तर तुमच्या मनात हजारो प्रश्न निर्माण करेल. तुम्ही द्विधा नव्हे, तर त्रिधा अवस्थेत जाल. या प्रश्नांचे उत्तरे सापडता सापडता कोरोना निघूनही गेलेला असेल. त्यामुळे तो विचार तुमचा तुम्ही करा.
‘आता राहिला दुसरा प्रश्न. तुमचा मोबाइल दिवसातील काही काळ कोठे तरी गायब होतो. तर तो कधी जातो, कसा जातो, हे शोधायचं काम करायला फारसे डोकं वापरू नका. फक्त तुमच्या सौभाग्यवती आंघोळीला जातात, तेव्हा जर मोबाइल गायब होत असेल, तर तो त्यांच्यासोबत जाता? असेल असे ओळखावे. असं जर होत असेल, तर आपल्यावर भलं मोठं संकट आलेलं आहे, असे ओळखावे.’ आम्ही जरा सर्द झालो. म्हणालो, ‘तुम्हाला कसं कळलं?’ तसे बंडोपंत सुरक्षित अंतर ठेवून बाकड्यावर बसून पु.ल़. देशपांडे यांच्या शैलीत म्हणाले, ‘त्याचं काय आहे, आम्ही त्या अनुभवातून गेलो आहे राव! आमच्या सौभाग्यवतींची फार करडी नजर आमच्या आमच्या मोबाइलवर. बरोबर त्या आंघोळीला जाताना माझा मोबाइल गायब व्हायचा. तेव्हा एकदा धीर एकवटून म्हणालो, आंघोळीला जाताना माझा मोबाइल कशाला घेऊन जाता? तशा त्या फटदिशी म्हणाल्या, का म्हणजे? बादली भरेपर्यंत बघते तुमचे पराक्रम!’ आणि आम्ही चाटच पडलो राव. मग आम्ही अधिर होऊन विचारलं, ‘त्यावर काय उपाय केला?’ तसे बंडोपंत हसून म्हणाले, ‘काही करायचे नाही, फक्त सिम कार्ड काढून ठेवायचे. कसला फोन सुरू होतोय? इनसर्ट सिम कार्ड म्हणून पुढे चालतच नाही. मग आंघोळीचे पाणी गार होते, म्हणून सौभाग्यवतीने मोबाइल नेण्याचा नाद सोडून दिला. वर म्हणाल्या, ही कोण बया इनसर्ट सिम कार्ड, इनसर्ट सिम कार्ड म्हणते ? आणि पुढे माझं काही चालू देत नाही. जळला मेला तुमचा मोबाइल! मग आम्ही फार चिंतेत असल्यासारखे म्हणालो, खूप दिवस झाले मोबाइलला. त्यामुळे तसं झालं असेल. दुसरा घेऊ या आपण. तशा सौभाग्यवती म्हणाल्या, नवा घ्या चांगला मोबाइल, तोपर्यंत वापरा तुमचा तुम्हीच. तेव्हापासून मोबाइल सुरक्षित अंतर ठेवून माझ्याजवळ आहे. कशी वाटली आयडियाची कल्पना?’ आम्ही तर पार उडालोच की राव.
डॉ.गजानन पाटील, रत्नागिरी