सेकंडऐवजी फर्स्ट शिफ्टला गेला अन् आलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:28 IST2021-03-22T04:28:39+5:302021-03-22T04:28:39+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : भावाच्या लग्नानिमित्त पत्नीला चरई येथे सोडून कामावर हजर होण्यास गेलेल्या महेश महादेव कासार (वय ...

I went to the first shift instead of the second | सेकंडऐवजी फर्स्ट शिफ्टला गेला अन् आलाच नाही

सेकंडऐवजी फर्स्ट शिफ्टला गेला अन् आलाच नाही

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : भावाच्या लग्नानिमित्त पत्नीला चरई येथे सोडून कामावर हजर होण्यास गेलेल्या महेश महादेव कासार (वय २६, रा. चरई, पाेलादपूर) याला सेकंड शिफ्टची ड्युटी असताना फर्स्ट शिफ्टला बोलविण्यात आले आणि याच काळात घरडा केमिकल्स कंपनीत दुर्घटना झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

महाड औद्योगिक वसाहतीमधील कोप्रॉन कंपनीमध्ये काही काळ काम केल्यानंतर महेश महादेव कासार याने २०१८ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये असलेल्या लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा केमिकल्स कंपनीमध्ये जास्त पगाराची नोकरी पत्करली. यानंतर, काही महिन्यांमध्येच लग्न करून खेड भरणानाका येथील कालिकामाता मंदिराजवळील एका खोलीमध्ये संसारही थाटला. येत्या ८ एप्रिल, २०२१ रोजी त्याच्या भावाचे लग्न असल्याने, त्याने त्याच्या पत्नीला गुरुवारी दोन दिवसांच्या सुट्टीमुळे पोलादपूर तालुक्यातील चरई येथील घरी आणून ठेवले. त्याची शनिवारी सेकंड शिफ्ट हाेती. मात्र, त्याला फर्स्ट शिफ्टला कामावर बोलविल्याने महेश तातडीने कामावर रवाना झाला. शनिवारी सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास घरडा केमिकल्स कंपनीमध्ये दोन स्फोट झाल्याची बातमी पाेलादपूरमध्ये धडकली.

पोलादपूर येथील एका दुकानात असलेले त्याचे वडील महादेव कासार यांना, तसेच कुटुंबीयांना महेशबाबत चिंता वाटू लागली आणि संदीप गांधी, चंद्रकांत कासार, तसेच अन्य काही जणांनी तातडीने चौकशी करण्यास सुरुवात केली. यावेळी चौकशी करण्यात वेळ घालविण्यापेक्षा घटनास्थळी जाण्यास प्राधान्य देण्याचे ठरल्याने, ही मंडळी खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये पोहोचले. तेथे ओळख पटल्यावर मृतदेह गावी आणण्यात आला. तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चाैकट

कानातील बाळीवरून ओळखले मुलाला

महेशचे कुटुंबीय कळंबणी येथील रुग्णालयात पाेहाेचले असता, त्यांनी माहिती घेण्यास सुरुवात केली. त्याच वेळी कानातील बाळी या दागिन्यावरून एक जळलेला मृतदेह महेश याचाच असल्याचे त्याचे वडील महादेव कासार यांनी ओळखले. त्यानंतर, ते सुन्न झाले, तर सोबतच्या लोकांनी त्यांना सावरत शवविच्छेदन करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. कर्ता तरुण मुलगा अचानक गमावल्याच्या दु:खाने वडील स्तब्ध झाले होते, तर दिराच्या लग्नासाठी सासरी लग्नघरातील मदतीला आलेली सूनबाई अकाली वैधव्य आल्याने रडून निपचित झाली होती.

Web Title: I went to the first shift instead of the second

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.