ऐतिहासिक विहीर भागवतेय तहान

By Admin | Updated: April 16, 2015 00:04 IST2015-04-15T23:09:18+5:302015-04-16T00:04:32+5:30

वर्षभर पाणीपुरवठा : पुष्करणी पध्दतीचे पेशवेकालीन बांधकाम

The historic well parted ground thirst | ऐतिहासिक विहीर भागवतेय तहान

ऐतिहासिक विहीर भागवतेय तहान

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी -- तालुक्यातील बसणी गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर पेशव्यांचे सरदार विसाजीपंत लेले व त्यांचे बंधू महादजी केशव लेले यांनी बांधली आहे. पोखरबाव ही पुष्करणी पद्धतीची ऐतिहासिक विहीर आहे. पुरातन वास्तूचा उत्तम नमुना असून, या विहिरीसाठी संरक्षण तट बांधणे गरजेचे आहे. याबाबत वेळोवेळी ग्रामस्थांकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
सागरी महामार्गावर बसणी गावातील रस्त्याच्या कडेला पुष्करणी विहीर आहे. बसणी गावाच्या पूर्वेला २ ते ३ किलोमीटर अंतरावर विसाजी केशव लेले यांनी डोंगरामध्ये एक तळे बांधले होते. गावणचे तळे या नावाने ते प्रसिद्ध आहे. बसणीतील ग्रामस्थांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी विश्वेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणात मोठा हौद बांधला. तसेच वाटसरुंसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता पुष्करणी विहीरदेखील बांधली. सुंदर दगडी कमानी व विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. उन्हाळ्यात वाटसरुंची तहान भागवली जावी, यासाठी वाटसरुला थेट विहिरीत उतरणे पायऱ्यांमुळे शक्य होते. पावसाळ्यात तर ती विहीर भरुन वाहात असते. या विहिरीतून बसणीतील ग्रामस्थांना पाणीपुरवठा होतो. मात्र, मे महिन्याच्या कालावधीत या विहिरीतील पाणी कमी होते.
इ. स. १७५०च्या आसपास विहिरीचे बांधकाम झाले आहे. पुष्करणी विहिरीमुळे बसणी गावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. विहिरीलगत पिंपळ वृक्ष होते. मात्र, काळाच्या ओघात ते नष्ट झाले आहेत. रस्ता रुंदीकरणाच्या वेळी ग्रामस्थांच्या योग्य भूमिकेमुळे पोखरबाव अर्थात पुष्करणी विहिरीचे संरक्षण झाले आहे.
पुरातन विहीर असल्याने या वास्तूचे जतन होणे आवश्यक आहे. विहिरीला संरक्षक तट बांधण्याबरोबरच विहिरीतील गाळ उपसून आणखीन खोदाई करण्यात आली तर पाणी संपूर्ण गावाला वर्षभर पुरेल, एवढा पाणीसाठी या विहिरीत होऊ शकतो.

पेशवेकालीन विहिरीच्या संरक्षणासाठी संपूर्ण गावातील ग्रामस्थ एकवटले होते. त्यामुळे सध्या तरी या विहिरीचे संरक्षण झाले आहे. वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करुन संरक्षक तट बांधणीसाठी निधीची मागणी करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन पुरातन विहिरीचे संरक्षण करणे आवश्यक आहे.
- प्रशांत बंदरकर,
ग्रामस्थ, बसणी



५१७५०मध्ये बसणी गावातील रस्त्यालगत सुभेदार विसाजी लेले यांनी पोखरबाव पुष्करणी विहीर बांधली. पेशवाईत बांधलेल्या बसणीतील पोखरबावला महत्व प्राप्त झाले आहे. या गावातून चारही बाजूला रहदारी होती. ग्रामस्थ व वाटसरुंची सोय व्हावी, याकरिता लेले यांनी ही विहीर बांधली. पोखरबावमुळे मूळ नाव पुसाळ असलेल्या गावाचे नाव बसणी झाल्याचे येथील बुजूर्ग ग्रामस्थ सांगतात.

Web Title: The historic well parted ground thirst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.