‘तो’ वाढदिवस पत्नीच्या अखेरच्या स्मरणातला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:28 IST2021-03-22T04:28:22+5:302021-03-22T04:28:22+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : घरडा केमिकल कंपनीत झालेल्या दुर्घटनेत शहरालगतच्या रेहेळ भागाडी - सकपाळवाडीतील आशिष चंद्रकांत गोगावले याच्या ...

‘His’ birthday is in his wife’s last memory | ‘तो’ वाढदिवस पत्नीच्या अखेरच्या स्मरणातला

‘तो’ वाढदिवस पत्नीच्या अखेरच्या स्मरणातला

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : घरडा केमिकल कंपनीत झालेल्या दुर्घटनेत शहरालगतच्या रेहेळ भागाडी - सकपाळवाडीतील आशिष चंद्रकांत गोगावले याच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि अख्खी पंचक्रोशी हादरली. अवघ्या ३१ वर्षांच्या या तरुणाने तीन दिवसांपूर्वीच १६ मार्च रोजी पत्नी अवनी हिचा वाढदिवस साजरा केला होता. तो वाढदिवस पत्नीसाठी आज अखेरचा ठरला आहे.

तीन वर्षांपूर्वी आशिष विवाहबध्द झाला. सोन्यासारखी मुलगी झाली. आई - वडील, पत्नी, मुलगी आणि भाऊ अशा कुटुंबात तो रमलेला. मनमिळावू, प्रेमळ आणि शांत स्वभाव. आपली पत्नी, चिमुकलीसह त्याचा संसार फुलत असतानाच, अचानक काळाने झडप घातली आणि आशिष सर्वांचाच निरोप घेऊन देवाघरी गेला. कामावर गेलेल्या आशिषचा अचानक मृतदेह पाहून कुटुंबाच्या पायाखालची वाळूच सरकली. सर्वांनी हंबरडा फोडताच ग्रामस्थांनाही अश्रू अनावर झाले. रात्री साश्रुनयनांनी त्याला निरोप देण्यात आला.

आशिष गोगावले हा येथील डीबीजे महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी. लोटे येथील घरडा केमिकल कंपनीत नोकरी करत होता. वडील चंद्रकांत गोगावले हे एलआयसीचे विमा प्रतिनिधी आहेत. गेली काही वर्षे गोगावले कुटुंब खेर्डी विकासवाडी येथे वास्तव्य करीत आहे. त्याला वर्षाची अद्विका ही मुलगी आहे. त्यांचे वास्तव्य खेर्डीत असले तरी, गावाची ओढ त्याला नेहमीच होती. गावात पहिला होम लागला, तेव्हा आशिष गावी आला होता. मित्रांसोबत त्याने गप्पा मारल्या. माझ्या कंपनीत तुला नोकरी लावतो, असे एक वचन त्याने आपल्या मित्राला दिले होते. चांगली नोकरी असल्याने त्याचा संसार आनंदात अन्‌ सुखात सुरू होता. भविष्याची असंख्य स्वप्ने त्याने रंगवली होती. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. घरडा केमिकल्स कंपनीतील दुर्घटनेत त्याला आपला जीव गमवावा लागला. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने गोगावले कुटुंब पार विस्कटून गेले आहे. त्याचं अचानक निघून जाणं मित्रांसाठीही न पचणारं दुःख आहे. पंचक्रोशीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शनिवारी त्याच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. रात्री रेहेळ - भागाडी येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: ‘His’ birthday is in his wife’s last memory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.