घरडा केमिकल्समधील स्फोटाची उच्चस्तरीय चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:28 IST2021-03-22T04:28:02+5:302021-03-22T04:28:02+5:30
रत्नागिरी : खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा केमिकल्स या उत्पादक कंपनीत शनिवारी झालेल्या स्फाेटात चार जणांचा मृत्यू झाला, ...

घरडा केमिकल्समधील स्फोटाची उच्चस्तरीय चौकशी
रत्नागिरी : खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा केमिकल्स या उत्पादक कंपनीत शनिवारी झालेल्या स्फाेटात चार जणांचा मृत्यू झाला, तर एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेची उच्चस्तरीय समिती नेमून सखोल चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे.
लाेटे औद्याेगिक वसाहतीतील दुर्घटनेनंतर संपूर्ण यंत्रणा हादरून गेली आहे. या दुर्घटनेत चारजणांचा मृत्यू झाला आहे, तर एका गंभीर जखमी झालेल्या कामगाराला ऐराेली येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी लाेटे औद्याेगिक वसाहतीत याेग्य त्या उपाययाेजना करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत, तर उद्याेग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनीही या दुर्घटनेची दखल घेऊन उच्चस्तरीय चाैकशी करण्याची घाेषणा केली आहे.
त्याचबरोबर दुर्घटनेतील पीडित कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचेही आदिती तटकरे यांनी सांगितले. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५५ लाख रुपये देण्यात येणार असल्याचे घरडा केमिकल्सतर्फे सांगण्यात आले आहे, तर जखमी कामगाराच्या उपचारासाठी २० लाख रुपये देण्याचेही कंपनीने जाहीर केले आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी तातडीने औद्योगिक सुरक्षेच्या कारणास्तव आवश्यक त्या सर्व उपाययोजनांचा आढावा घेऊन, ज्या ठिकाणी गरज आहे, अशा ठिकाणी औद्योगिक सुरक्षा उपाययोजना तत्काळ राबविण्यात येतील, असेही राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.