किल्ले संवर्धन संस्थेने दिला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:33 IST2021-08-22T04:33:58+5:302021-08-22T04:33:58+5:30
अडरे : चिपळूण, महाड, खेडमध्ये आलेल्या महापुरामुळे लोकांची प्रचंड वित्तहानी झाली आहे. अनेक संसार उघड्यावर आले तर अनेकांचे संसार ...

किल्ले संवर्धन संस्थेने दिला मदतीचा हात
अडरे : चिपळूण, महाड, खेडमध्ये आलेल्या महापुरामुळे लोकांची प्रचंड वित्तहानी झाली आहे. अनेक संसार उघड्यावर आले तर अनेकांचे संसार वाहून गेले. या पूरपरिस्थितीत चिपळुणातील किल्ले संवर्धन संस्थेने पूरग्रस्तांना मदतीचा हात देऊन मानसिक बळ दिले.
पूरपरिस्थितीच्या काळात पहिल्या टप्प्यात मदत करताना संस्थेने चिपळुणातील तीन हजार लोकांची जेवणाची व्यवस्था केली हाेती. तसेच २०० कुटुंबांपर्यंत धान्य व इतर घरगुती वस्तू पोहोचविल्या हाेत्या. पूरग्रस्त लोकांना तात्पुरती मदत तर मिळाली. परंतु, त्यांना परत उभे करण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला. पुरामुळे मोठ्या प्रमाणात घराची व व्यवसायाची पडझड झालेल्या काही कुटुंबांना त्यांचा संसार किंवा व्यवसाय पुन्हा उभारण्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली. तसेच आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झालेल्या व घरी कमवते हात कमी असलेल्या पूरग्रस्तांसाठी एका लिंकद्वारे माहिती संकलित करून प्रत्यक्ष पाहणी करून त्यांना मदत करण्यात आली.
खेर्डी वरचीपेठ येथील वैशाली डोईफोडे यांचा टेलरिंगचा व्यवसाय होता. मुलगा व पती यांचे पूर्वीच निधन झाले होते. या संस्थेने त्यांना लागणाऱ्या मशीन तसेच इतर सर्व साहित्य उपलब्ध करून दिले. चिपळूण शिवनदीजवळ आशिष गोंधळेकर यांचा ४५ वर्षांपासून घड्याळ रिपेअरिंग व विक्रीचा स्टॉल होता. तोही पुरात उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्या आईच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला हाेता. अशावेळी संस्थेने त्यांना मदत करून त्यांना ७५ घड्याळे व रिपेअरिंग किट देऊन त्यांचे दुकान पूर्ववत सुरू करण्यास मदत केली. तसेच विविध गरजू कुटुंबांपर्यंत शेगडी, फॅन, मिक्सर, भांडी यासारखी वस्तूरूपी मदतही देण्यात आली. या मदत कामात किल्ले संवर्धन संस्थेचे सत्यजित भोसले, सागर गुजर, प्रशांत काळाने यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला हाेता.