रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पावसाने असह्य उकाड्यानंतर मंगळवारी दुपारनंतर मेघगर्जेनसह जोरदार हजेरी लावली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार २४ मेपर्यंत मेघगर्जनेसह मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असून कोकणात २५ ते ३१ मे दरम्यान सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपासून उष्णता कमालीची वाढली आहे. त्यामुळे उष्म्याने हैराण झालेले नागरिक पावसाची प्रतीक्षा करीत होते. मात्र, रत्नागिरी शहराच्या परिसरात तसेच अन्य तालुक्यांमध्ये हजेरी लावलेला पाऊस रत्नागिरी शहरात मात्र गायब होता. गेल्या काही दिवसांपासून आभाळ ढगांनी आच्छादलेले होते. मात्र, पावसाची हुलकावणीच होती. अधूनमधून किरकाेळ सर पडून गेल्यानंतर उकाडा अधिकच होत होता.
सोमवारी सकाळीही पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली. मंगळवारीही तसेच वातावरण होते. मात्र, दुपारी अचानक मेघगर्जनेसह आलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची तारांबळ उडवून दिली. रेनकोट, छत्री नसल्याने अनेकांना जवळच घरांचा किंवा दुकानांचा आसरा घ्यावा लागला. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा सायंकाळी विजा आणि मेघांच्या गडगडाटात पावसाला सुरुवात झाली. जोडीला वाराही होता. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे थोडासा गारवा येण्यास मदत झाली.लांजा, रत्नागिरी येथे मंगळवारचा आठवडा बाजार भरतो. दुपारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे आठवडा बाजारात दाणादाण उडाली. या बाजारात आलेल्या व्यापाऱ्यांची माल भिजू नये, यासाठी तारांबळ उडाली. पावसाळ्यासाठी अनेकांनी घेतलेल्या कांदे-बटाट्याच्या पोती भिजल्या. तसेच भाजीपालाही ओला झाला. आठवडा बाजाराच्या परिसरात पहिल्याच दिवशी पाणी भरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. तसेच ग्राहकांचाही माल भिजला.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये २० ते २४ मे या कालावधीत काही ठिकाणी विजांचा लखलखाट, सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच किमान व कमाल तापमान २१ ते ३१ अंश सेल्सिअस राहील.
चिपळूणला झोडपले, घरावर वीज पडल्याने नुकसानचिपळूण : शहर व परिसरात सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यादरम्यान शहरातील शंकरवाडी मार्गावरील एका घरावर वीज कोसळली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एका घराचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. मंगळवारीही पावसाने चिपळूण परिसराला झोडपले. शहरातील काही वस्तीत गटारे तुंबल्याने घरांमध्ये पाणी शिरले. सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी सायंकाळीही मुसळधार पावसाने चिपळूणला झोडपले. चिपळुणात सोमवारी सायंकाळनंतर पावसाने झोडपले. रात्री पावणेदहाच्या सुमारास वादळी वारा आणि पाऊस सुरू असतानाच विजांच्या कडकडाटात शंकरवाडी येथील घरावर वीज पडली. मुनावर नाईक व आयुब नाईक यांचे कुटुंबीय एका कार्यक्रमाला जाण्यासाठी घराबाहेर पडत होते. त्याचदरम्यान त्यांच्या घरावर वीज पडली. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. दैव बलवत्तर म्हणून हे कुटुंब वाचले. मात्र, घरातील सर्व विद्युत उपकरणे जळून खाक झाली. महसूलच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. वीज पडल्यानंतर मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आला. थोडा वेळ नेमके काय झालेय हे कोणालाच कळले नाही.