सचिन मोहिते/देवरुख
कलेची कोणतीही परंपरा नसताना केवळ आवड असल्याने त्याने मूर्तिकाम करण्याचे ठरवले आणि त्यातून शिल्पकला जोपासलीय ती संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील तरुण विश्वजीत कदम याने. विश्वजीत कदम याला त्याची जिद्द, चिकाटी शांत राहू देत नव्हती. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. मात्र, या गरिबीवर मात करण्यासाठी विश्वजीतला शिल्पकलाच आधारभूत ठरली. त्यातून त्याला चार पैसे मिळविण्याचे साधनही उपलब्ध झाले असून, त्यात तो यशस्वीही झाला आहे.
सध्या विश्वजीत कदम नाशिकमध्ये ६ फूट उंचीचे स्वामी विवेकानंद यांचे शिल्प काढण्यात गुंतला आहे. आरवली-बौद्धवाडी येथे राहणारा विश्वजीत कदम याला कलेची आवड आहे. त्याने गावातील व काही मित्रांच्या गणपती कारखान्यात जाऊन गणपती साकारण्याचे काम केले. त्यातूनच त्याची कला दिवसेंदिवस बहरत गेली. या कलेच्या माध्यमातून मिळणारी रक्कम ताे साठवून ठेवू लागला.
आपण काही करून शिल्पकार व्हायचे, ही जिद्द त्याने उराशी बाळगली हाेती. त्यासाठी लागेल ते काम करण्याचा निर्णयही त्याने घेतला. कालांतराने त्याने चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. तेथील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली त्याने कलेचे धडे गिरवायला सुरुवात केली. सातत्य, मेहनत आणि आकांक्षापुढे गगनही ठेंगणे असते, असे म्हणतात तसा ताेही त्यात यशस्वी झाला. शिक्षण घेत असतानाच त्याने अनेक पुरस्कारही मिळविले. हे पुरस्कार त्याला अधिक प्राेत्साहन देत हाेते.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला नाशिक येथे उभ्या राहणाऱ्या आर्ट गॅलरीमध्ये स्वामी विवेकानंद यांचे शिल्प लाकडावर साकारण्याची संधी मिळाली. विश्वजीतने या संधीचे सोने करत लाकडावरील हे शिल्प साकारत त्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. विश्वजीत कदमकडून ६ फूट उंचीचे स्वामी विवेकानंद यांचे शिल्प पूर्णत्वास जात आहे.
200821\1615-img-20210820-wa0056.jpg
विश्वाजित कदम शिल्पकला