उद्घाटनापूर्वीच हॉलची डागडुजी
By Admin | Updated: September 6, 2015 23:17 IST2015-09-06T23:17:00+5:302015-09-06T23:17:00+5:30
आंबोलीतील स्थिती : स्लॅबमधून गळती; ग्रामस्थांकडून काम बंद

उद्घाटनापूर्वीच हॉलची डागडुजी
सावंतवाडी : आंबोली येथील बहुउद्देशीय हॉल उद्घाटनाच्या उंबरठ्यावर असतानाच त्याची पुन्हा डागडुजी करण्याचा घाट घातल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. पूर्ण झालेल्या हॉलला अवघ्या दोन महिन्यात गळती लागल्याने डागडुजीचे काम शुक्रवारी ग्रामस्थांनी काम बंद पाडले. त्यामुळे या कामाची सखोल चौकशी करा, अशी मागणी आंबोली पंचायत समिती सदस्या रोहिणी गावडे यांनी केली असून, त्याबाबत लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंग यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आंबोली येथे ९ लाख ९९ हजार रूपये खर्च करून अद्ययावत असा ग्रामपंचायत शेजारीच बहुउद्देशीय हॉल नियोजन विभागाच्या जनसुविधा निधीतून उभारण्यात आला. गेल्यावर्षी या कामाला सुरूवात झाली तर मार्चपूर्वी हे काम पूर्ण करण्यात आले होते.
तसेच त्या ठेकेदाराचे बिलही अदा करण्यात आले होते. या इमारतीचे उद्घाटन ३० आॅगस्टला करण्याचे ठरले होते. मात्र, त्या दिवशी देशाचे माजी राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम यांचे निधन झाल्याने शासनातर्फे सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आला. त्यामुळे या शासकीय इमारतीचे उद्घाटन करण्याचे टाळण्यात आले.
दरम्यान, याच काळात या इमारतीच्या काही भागात स्लॅबमधून पाण्याची गळती लागली होती. ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी यावर आवाज उठवण्यास सुरूवात केली. अनिल चव्हाण यांनी याबाबतची तक्रार पंचायत समितीकडे केली.
आपल्या कामाची नव्याने चौकशी होणार या भीतीने आंबोली विभागाचे जिल्हा परिषदचे शाखा अभियंता आर. एच. पाटील यांनी ठेकेदाराला हाताशी धरत गेले दोन ते तीन दिवस इमारतीची गळती काढण्याचे काम सुरू केले आहे. याबाबत ग्रामस्थांनी आवाज उठवल्यानंतर हे काम बंद करण्यात आले. तसेच तक्रारदार अनिल चव्हाण यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंग यांच्याकडेही याबाबत तक्रार केली आहे.
आंबोली पंचायत समिती सदस्या रोहिणी गावडे यांनी, बहुउद्देशीय हॉलचे काम पूर्ण झाले असून, त्याचे उद्घाटन करण्यात येणार होते. मग आता त्याची डागडुजी कशी? असा सवाल करत शाखा अभियंता आर. एच. पाटील यांच्या प्रत्येक कामाची जिल्हा परिषदेने चौकशी करण्याची मागणी केली. अनेक कामात भ्रष्टाचार असून, जनतेचे पैसे जर योग्यरितीने खर्च केले जात नसतील तर मग लोकप्रतिनिधी हवेच कशाला, असा सवालही केला आहे. शाखा अभियंत्याच्या कामाच्या चौकशीचा ठराव ग्रामसभेत केला आहे, असेही यावेळी गावडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
याबाबत उपविभागीय अभियंता राजन पाटील यांना विचारले असता काम पूर्ण झाले आहे, तरीदेखील हॉलच्या कामाबाबत अधिक माहिती घेतली जाईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)