नाणारमधील प्रकल्प विरोधातील गुन्हे मागे घेताच जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 16:28 IST2019-12-03T16:26:50+5:302019-12-03T16:28:16+5:30
नाणार प्रकल्प विरोधकांवरील दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर प्रकल्प परिसरातील जनतेने सागवे येथे मंगळवारी जल्लोष केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानण्यात आले.

नाणारमधील प्रकल्प विरोधातील गुन्हे मागे घेताच जल्लोष
राजापूर : नाणार प्रकल्प विरोधकांवरील दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर प्रकल्प परिसरातील जनतेने सागवे येथे मंगळवारी जल्लोष केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानण्यात आले.
शिवसेना सदैव प्रकल्प विरोधकांच्या साथीने उभी राहिली. यामध्ये शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सर्व आंदोलनात सहभागी झाली होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सागवे येथे येऊन प्रकल्प रद्द करू असा शब्द दिला होता. त्यानंतर शासनाला प्रकल्प रद्द करायला भाग पाडले होते. महाराष्ट्र विकास आघाडीची राज्यात सत्ता येताच प्रकल्पविरोधकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. हे गुन्हे मागे घेतले जाणार असल्याची घोषणा केल्यानंतर प्रकल्पग्रस्त परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला .
मंगळवारी सकाळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, सभापती अभिजीत तेली, माजी सभापती व शेतकरी, मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष कमलाकर कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य व शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख रामचंद्र सरवणकर, राजेंद्र कुवळेकर यासहित शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर कोकण शक्तीचे अध्यक्ष अशोक वालम, मच्छीमार नेते मज्जीद भाटकर, भूमीकन्या एकता मंचच्या नेहा दुसणकर यासहित अनेक प्रकल्पविरोधक सागवे येथे जमले होते.
सागवे परिसरात जमलेल्या प्रकल्पग्रस्तांनी एकमेकांना लाडू भरवून आनंद व्यक्त केला. त्यावेळी ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शिवसेना प्रकल्पग्रस्तांच्या नेहमीच बाजूने राहिली व अखेर शिवसेनेमुळेच प्रकल्प रद्दही झाला आणि आता शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांमुळे आंदोलकांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.
अ३३ंूँेील्ल३२ ं१ीं