अपंगांसाठी शासनाचं पांगळं धोरण
By Admin | Updated: January 29, 2015 23:41 IST2015-01-29T22:15:45+5:302015-01-29T23:41:23+5:30
कुठली सक्ती, कुठला अधिकार? : विशेष शिक्षकच नसल्याने गैरसोय

अपंगांसाठी शासनाचं पांगळं धोरण
रत्नागिरी : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील तरतुदीनुसार बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे. असे असताना जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या हजारो अपंग विद्यार्थ्यांना विशेष शिक्षकच नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे या शिक्षणाच्या अधिकारापासून मोठ्या प्रमाणात अपंग मुले वंचित राहत आहेत.अपंग विद्यार्थ्यांमध्ये केवळ शारिरीक अपंग हाच विषय येत नाही. परंतु कर्णबधीर, वाचादोष, अल्पदृष्टी, अंध, बहुविकलांग, मेंदूचा पक्षाघात, अध्ययन अक्षम, स्वमग्न असे विविध प्रकार येतात. या प्रकारांमधील विद्यार्थ्यांना हे विशेष शिक्षण मिळण्याची आवश्यकता असेल. कर्णबधीर, मतिमंद अशा विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी डी. एड. मध्ये स्वतंत्र अभ्यासक्रम असतो आणि तो पूर्ण केलेला शिक्षकच अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या आकलन क्षमतेनुसार शिक्षण देत असतो. पण जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी रत्नागिरी तालुक्यात केवळ आठच शिक्षक आहेत. ज्याठिकाणी पहिली ते आठवीपर्यंत जवळपास १२५९ विद्यार्थी अपंग आहेत. त्यामुळे अन्य शिक्षकांच्या माथीच या मुलांचे शिक्षण मारले जात आहे. ते शिक्षक आपल्याला जमेल तसे या अपंग विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. त्यामुळे अपंग विद्यार्थ्यांची शैक्षणिकदृष्ट्या ससेहोलपट होत आहे.
सन २०१४-१५च्या यु - डाईसच्या आकडेवारीनुसार राज्यात २ लाख ९३ हजार २८३ बालके ही विविध कारणांनी अपंग आहेत. काही विद्यार्थी समाजकल्याण अंतर्गत चालणाऱ्या विशेष शाळेत दाखल आहेत. जिल्ह्यात अशी एकही शाळा नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास ५ ते ६ हजार अपंग विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या सामान्य शाळांमध्येच दाखल होत आहेत आणि तेथे त्यांना सामान्य शिक्षकांकडून सामान्य मुलांसोबत त्यांच्यादृष्टीने अनाकलनीय असलेल्या अध्यापनाला सामोरे जावे लागत ंआहे. त्यांना विशेष शिक्षकांशिवाय अन्य कोणीही शिकवू शकत नाही कारण त्यांना त्याचे आकलन होऊ शकत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अपंग विद्यार्थी असताना, केवळ १९४७ शिक्षक नेमण्यात आले आहेत. अपंग विद्यार्थ्यांना अन्य विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षण घ्यावे लागत आहे. (वार्ताहर)
धरणे आंदोलन करणार
राज्य शासनाच्या या अपंगविरोधी धोरणाविरोधात अपंग विद्यार्थ्यांचे पालक हे आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली धरणे आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन २ फेब्रुवारी रोजी प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येणार आहे. याची दखल घेतली न गेल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शासनातर्फे देण्यात आला आहे.
विशेष शिक्षक संघाचा पाठिंबा
या आंदोलनाला विशेष शिक्षक संघानेही पाठिंबा दिला आहे. रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी विशेष शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
अपंग विद्यार्थ्यांमध्ये कर्णबधीर, वाचादोष, अल्पदृष्टी, अंध, बहुविकलांग, मेंदूचा पक्षाघात, अध्ययन अक्षम, स्वमग्न असे विविध प्रकार.
अपंग विद्यार्थ्यांना त्यांच्या आकलनशक्तीसाठी हवा असतो स्वतंत्र शिक्षक.