रत्नागिरी : अवकाळी पाऊस व हवामानात सातत्याने होणारे बदल, यामुळे जिल्ह्यातील आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आंबा उत्पादक शेतकरी यामुळे उद्ध्वस्त झाला आहे. तरीही शासन नुकसान भरपाई देण्यास उदासीन असल्याची खंत रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्थेतर्फे व्यक्त करण्यात आली आहे.आंबा, काजू हंगामाला माहे नोव्हेंबरपासून फवारणी करावी लागते. नोव्हेंबर ते मार्च महिन्यांमध्ये पाऊस पडला. त्यामुळे उत्पादकांना परत परत फवारणीची कामे करावी लागली. परिणामी फवारणीसाठी दुप्पट खर्च करावा लागला आहे. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये झाडांना आलेला मोहोर मोठ्या प्रमाणात होता. शिवाय उत्पादकांना दिलासा देणारा होता. मोहोराला कणीएवढी फळधारणा झाल्यावर अचानकपणे तीन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्याने मोहोर कुजला. त्यामुळे बुरशीसारख्या रोगांनी मोहोरातील कणी खराब होऊन झडून गेल्याने आंबा पिकाचे नुकसान झाले.शासकीय कृषी खात्यातर्फे पिकाचा पंचनामा सुरू आहे. ७० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत. आंबा पिकाची ही दयनीय अवस्था आंबा उत्पादक संस्थेने शासनाच्या लक्षात आणून दिली आहे. परंतु, शासन याबाबत संवेदनशील दिसत नाही. अजूनही नुकसानात गेलेल्या आंबा उत्पादकांना कोणत्या प्रकारे शासन मदत करणार आहे, याचा अंदाजच बांधता येणे अवघड झाले आहे. शासकीय उदासीन धोरणाबाबत आंबा उत्पादकातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.आंबा पिकाला हेक्टरी नुकसान भरपाईचा फायदा होणार नाही. हा निकष आंबा पिकाला अयोग्य आहे. आंबा पिकासाठी उत्पादकांना मोठा खर्च करावा लागतो. यावर्षी उत्पादनावरील खर्चसुध्दा भागणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उत्पादकांना सावरण्यासाठी शासनाने आर्थिक मदतीची घोषणा करून दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा आंबा उत्पादक संस्थेतर्फे करण्यात आली आहे.जिल्हा आंबा उत्पादक संघाने कोकणातील आंबा नुकसानग्रस्तांना मिळणाऱ्या भरपाईबाबत शासन दाखवत असलेल्या उदासिन धोरणाबद्दल संताप व्यक्त केला आहे. बागायतदार यातून सावरला नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
नुकसान भरपाई देण्याबाबत शासन उदासिन
By admin | Updated: March 25, 2015 00:46 IST