कातळावरील रान, पुठ्यातून साकारला गोवर्धन देखावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:30 IST2021-09-13T04:30:09+5:302021-09-13T04:30:09+5:30
अरुण आडिवरेकर/रत्नागिरी : गणेशाेत्सव म्हटला की विविध प्रकारचे देखावे आलेच. कधी पाैराणिक तर कधी चालू घडामाेडींवर आधारित असतात. मात्र, ...

कातळावरील रान, पुठ्यातून साकारला गोवर्धन देखावा
अरुण आडिवरेकर/रत्नागिरी : गणेशाेत्सव म्हटला की विविध प्रकारचे देखावे आलेच. कधी पाैराणिक तर कधी चालू घडामाेडींवर आधारित असतात. मात्र, या देखाव्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जाताे. त्यातही सध्या पर्यावरणपूरक देखावे करण्याकडे अनेकांचा कल असताे. या देखाव्यांमध्ये आजूबाजूंच्या वस्तूंचा वापर अधिक केला जाताे. साेमेश्वर-गुरववाडी (ता. रत्नागिरी) येथील युवक मयूर भितळे या युवकाने कातळावरील रान आणि पुठ्यांचा वापर करून चक्क गाेवर्धन देखावा साकारला आहे.
जिल्ह्यात घरोघरी बाप्पाचे आगमन झाले आहे. वर्षभर वाट पाहिल्यानंतर बाप्पाच्या आगमनासाठी प्रत्येकजण यशाशक्ती तयारी करतात. मात्र, काही जण गणपती सजावटीसाठी विशेष मेहनत घेताना दिसतात. गणेशाेत्सवातून सामाजिक संदेश आणि जनजागृती करण्याच्या उद्देशाने अनेकजण देखावे तयार करतात. सोमेश्वर - गुरववाडीमधील मयूर भितळे हा युवक नावीन्यपूर्ण देखावे करण्यासाठी धडपत असताे. इलेक्ट्रिशियन झालेला मयूर आई-वडील आणि बहिणीसाेबत राहताे. मागील तीन वर्षांपासून विविध प्रकारचे देखावे ताे साकारत आहे.
या वर्षी मयूरने गोवर्धन पर्वत करंगळीवर पेलणाऱ्या कृष्णाचा देखावा साकारला आहे. हा देखावा साकारण्यासाठी त्याने कापूस, कातळावरील हिरवेगार रान, पुठ्ठा आणि कागदाचा वापर केला आहे. छतावर लावण्यात आलेला कापूस पाहिल्यानंतर काेणालाही ढगांचाच भास हाेताे. तर कातळावरील रानांनी या देखाव्याची शाेभा आणखी वाढवली आहे. या देखाव्यात लावण्यात आलेले दगड कागदापासून तयार करण्यात आले असून, ते नैसर्गिक रंगाने रंगविण्यात आले आहेत. मात्र, ते पाहिल्यानंतर खराेखरचेच दगड असल्याचा भास हाेताे. तर कृष्ण आणि सवंगडी पुठ्यावर रेखाटण्यात आले आहेत. देखाव्यात दाखविण्यात आलेला डाेंगर विशिष्ट प्रकारे बसविण्यात आला असून, त्यावर ५० किलाे वजनाचे गवत ठेवण्यात आले आहे. हा देखावा सध्या कुतूहलाचा विषय बनला असून, अनेकांनी मयूरच्या कल्पकतेचे काैतुक केले आहे.
--------------
हा देखावा साकारण्यासाठी १५ दिवस लागले. या कामासाठी मित्र अभिजित आलीम याने मदत केली. पर्यावरणाला बाधा पाेहाेचेल असे काेणतेही साहित्य वापरण्यात आलेले नाही. पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करूनच हा देखावा साकारला आहे. कातळावरील रानाचा देखाव्यासाठी उपयाेग करण्यात आला आहे.
- मयूर भितळे