शेळीपालन दिशादर्शक : दीपक कदम

By Admin | Updated: March 28, 2015 00:08 IST2015-03-27T22:04:59+5:302015-03-28T00:08:30+5:30

पर्याय खुले : स्वत:च्या प्रगतीबरोबरच एका तरूणाने उभारला मार्गदर्शक प्रकल्प

Goat Pillar: Deepak Kadam | शेळीपालन दिशादर्शक : दीपक कदम

शेळीपालन दिशादर्शक : दीपक कदम

सुभाष कदम - चिपळूण  नोकरीसाठी लोकांच्या दारोदारी फिरायचे, त्यांचे चार शब्द ऐकून घ्यायचे एवढे करुनही अपेक्षित मोबदला पदरात पडत नाही. आपण लोकांकडे जाण्यापेक्षा लोक आपल्याकडे आले पाहिजेत, अशी खुणगाठ बांधून आपण शेळीपालन व्यवसायात गुंतल्याचे पेढांबे येथील शेतकरी दीपक रघुनाथ कदम यांनी सांगितले. दीपक कदम, त्यांच्या आई रजनी, पत्नी ज्योती व दोन लहान मुले यांच्यासह पेढांबे - मावळतवाडी येथे राहतात. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने मोलमजुरी करुन उदरनिर्वाह केला जातो. दहावीनंतर पुढे काय? याबाबत विचार करत असतानाच गावातील एका ज्येष्ठ नागरिकाकडून शेळीपालनाबाबत माहिती मिळाली आणि आपण शेळीपालनाकडे वळलो. गेली १० वर्षे आपण शेळीपालन करीत असून, सध्या आपल्याकडे २० शेळ्या व १० बोकड आहेत. पशुधन विकास अधिकारी डॉ. अशोक सकपाळ व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय औषध व लसीकरणही केले जाते. वर्षाकाठी आपण ८ ते १० बोकड विकतो. एका बोकडाची किंमत २० ते २५ हजार रुपये असते. त्यामुळे वर्षाकाठी दोन ते अडीच लाख रुपये मिळतात. यामध्ये साधारणत: दीड लाखाचा नफा होतो.
भविष्यात बंदिस्त शेळीपालन मोठ्या प्रमाणावर करण्याचा आपला विचार आहे. माझ्याकडे जमीन नाही. त्यामुळे गावातीलच दोन, तीन शेतकऱ्यांची एक एकर जमीन सध्या वापरण्यासाठी घेतली आहे. या जमिनीत नांगरणी करुन गवत पेरणार व तेथेच शेड बांधून शेळीपालन सुरु करणार आहे. आपण शेळीपालन प्रकल्प बघायला जातो. लोकांनी आपल्याकडे यायला हवे यासाठी आपला प्रयत्न आहे. हा व्यवसाय शास्त्रशुद्ध आधुनिक पद्धतीने केल्यास यामध्ये चांगला फायदा आहे


कठोर मेहनत घेतल्यास हमखास उत्पन्नाची हमी
शेळीपालन करतो म्हणून आपल्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन वेगळा आहे. परंतु, आज ना उद्या तो १०० टक्के बदलेल, यावर आपला विश्वास आहे. एखाद्याकडे ५० बकऱ्या व २ नर असतील तर वर्षभरात त्याच्या अंगणात चारचाकी गाडी दिसेल. पण, त्यासाठी कठोर मेहनत घेऊन व्यवस्थित लक्ष द्यायला हवे. हा व्यवसाय अतिशय फायद्याचा आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता अशा व्यवसायात यायला हवे, असे आवाहन दीपक कदम यांनी केले. कदम यांचा जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे शिरोही शेळीपालन गटात प्रथम क्रमांक आल्याने जिल्हास्तरावर सत्कारही करण्यात आला आहे.

Web Title: Goat Pillar: Deepak Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.