The glory of Mahakali was seated in the man's house | Ganpati Festival-महाकालीची गौराई विराजमान होते मानाच्या घरात

Ganpati Festival-महाकालीची गौराई विराजमान होते मानाच्या घरात

ठळक मुद्देमहाकालीची गौराई विराजमान होते मानाच्या घरातसुवासिनी करतात पूजा

अरुण आडिवरेकर 

रत्नागिरी : कोकण म्हटलं की, रूढी, परंपरा आल्याच. प्रत्येक सण, उत्सवात या रूढी, परंपरा आजही तेवढ्याच आत्मीयतेने जोपासल्या जात आहेत. राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील श्रीदेवी महाकालीची गौराई मंदिरात विराजमान न होता चक्क मानाच्या घरी विराजमान होते. येथील प्रभाकर गुरव यांच्या घरी पूर्वापार ही गौराई विराजमान होत असून, सुवासिनी उत्साहाने तिचे पूजन करतात.

आडिवरे येथे राणे - गुरव यांची ३ कुटुंब आहेत. या कुटुंबांपैकी प्रभाकर गुरव यांचे मूळ घर मानले जाते. त्यामुळे देवीचे बहुतांशी मान या घराकडेच आहेत. प्रभाकर गुरव यांच्याकडे विराजमान होणारी गौराईदेवी मानाची असल्याचे सांगितले जाते. या गौराईचे पूजन व सजावट करण्याची जबाबदारी आजही हे कुटुंबीय पार पाडत आहेत.

गौराई आणण्यासाठी मंदिरातून सुवासिनी सायंकाळी ५ वाजता निघतात. मंदिरातील ढोल वाजवत सुवासिनी हळदीचे रोप व पूजेचे साहित्य घेऊन भगवती मंदिराजवळील वजरावर जातात. तेथे पूजन करून या सुवासिनी परत घरी येतात. यावेळी गावातील इतर महिलादेखील आपापल्या घरातील गौराई आणण्यासाठी जातात. ढोल वाजवणाऱ्याला दक्षिणा म्हणून पानाचा विडा दिला जातो.

गौरी पूजनादिवशी प्रभाकर गुरव यांच्या घरी ठेवण्यात आलेला गौराईचा मुखवटा सजवला जातो. त्यानंतर तीनही कुटुंबातील सुवासिनींना ओवसासाठी सकाळी निमंत्रण दिले जाते. त्यानंतर दुपारी प्रत्येक घरातील सर्व सुवासिनी ओवसासाठी एकत्र येतात. ओवशासाठी असणाऱ्या सुपात देवीची पंचारती, मंडपीला लावण्यात आलेला नारळ घेऊन मंदिरात येतात. त्यानंतर सुवासिनी मंदिरातील देवतांसमोर ओवसे ठेवून पूजन करतात.

सुवासिनी करतात पूजा

नवीन लग्न झालेली सुवासिनी मंदिरात आपला ओवसा मानविण्यासाठी येते. अन्य महिला मंदिरात येत नाहीत. मात्र, प्रभाकर गुरव यांच्या घरातील सुवासिनी दरवर्षी ओवसा घेऊन मंदिरात येतात आणि त्याचे पूजन करतात.

खर्चही स्वत:चाच

देवीचा मुखवटा प्रभाकर गुरव यांच्याकडे ठेवलेला असतो. त्याची सर्व जबाबदारी त्यांच्याकडेच असते. मुखवटा सजवणे आणि त्यासाठी करण्यात येणारा सर्व खर्च ते स्वत:च करतात. ही प्रथा अनेक वर्षे सुरू आहे.

 

Web Title: The glory of Mahakali was seated in the man's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.