जिल्हा रूग्णालयाचे जनरल सर्जन करतात सायकलवरून प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:24 IST2021-06-01T04:24:11+5:302021-06-01T04:24:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शारीरिक श्रम नको आणि वेळेची बचत व्हावी, म्हणून अगदी फर्लांगभर जायचे असले तरी बहुतांश ...

जिल्हा रूग्णालयाचे जनरल सर्जन करतात सायकलवरून प्रवास
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शारीरिक श्रम नको आणि वेळेची बचत व्हावी, म्हणून अगदी फर्लांगभर जायचे असले तरी बहुतांश लोक दुचाकी किंवा अगदी काहीवेळा चारचाकीचा वापर करू लागले आहेत. सध्या घरातील सायकली कालबाह्य होण्याची भीती व्यक्त होत असली, तरीही रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रूग्णालयातील शल्य चिकित्सक डाॅ. ज्ञानेश विटेकर हे स्वत:ची तंदुरूस्ती आणि पार्किंग समस्येवर उपाय म्हणून गेल्या काही महिन्यांपासून घर ते जिल्हा रूग्णालय एवढा प्रवास सायकलवरून करत आहेत. त्यामुळे या दोन फायद्यांबरोबरच पर्यावरण प्रदूषणाला आळा आणि इंधन बचत हे दोन फायदे अनायसे होत आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले यांच्यासोबतच त्यांचे सर्व सहकारी डाॅक्टर आणि अन्य कर्मचारी गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचा अथक लढा देत आहेत. यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे या रूग्णालयातील शल्य चिकित्सक डाॅ. ज्ञानेश विटेकर. कोरोना काळातील रूग्णसेवेचे त्यांचे काम उल्लेखनीय असेच आहे. ही सेवा करताना ते स्वत:ही कोरोनाबाधित झाले होते. मात्र, त्यातून यशस्वीरित्या बाहेर पडल्यानंतरही त्यांची रूग्णसेवा तेवढ्याच जाेमाने सुरू आहे.
जिल्हा रूग्णालयात रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची नेहमीच वर्दळ असते. आता कोरोना काळात तर दुचाकी, चारचाकी गाड्यांची नेहमीच गर्दी होत असते. साहजिकच या भागात गाड्या कुठे लावायच्या, हा प्रश्न नेहमीच सतावत असतो. त्यामुळे या जिल्हा रूग्णालयातील डाॅक्टर मंडळींनाही ही समस्या नेहमीच येते.
या समस्येवर उत्तर शोधणारे डाॅ. विटेकर याच काळात कोरोनाबाधित झाले. त्यामुळे कोरोनाशी लढा देताना शारीरिक तंदुरूस्ती आणि पार्किंगची समस्या यावर त्यांना सायकलचा उपाय सुचला. त्यांनी तो अमलातही आणला. मारूती मंदिर येथील घरापासून ते जिल्हा रूग्णालयापर्यंतचा प्रवास चारचाकीतून किंवा दुचाकीवरून न करता, ते आता दररोज सायकलवरून करत आहेत. एवढेच नव्हे तर अगदी घरातीलही काही काम करण्यासाठी सायकल वापरत आहेत. त्यामुळे फिटनेससाठी त्यांना वेगळा वेळ द्यावा लागत नाही. काहीवेळा मारूती मंदिर ते शहराच्या मांडवी भागापर्यंतचा प्रवास सायकलवरून होत असतो.
सध्या कोरोनाच्या कालावधीत नोडल ऑफिसर ही जबाबदारीही असल्याने माॅर्निंग वाॅकसाठी वेळ मिळत नसला, तरीही आता सायकलने हे काम केले आहे. हलकी असल्याने पार्किंग समस्याही दूर झालीच पण शुगर, बीपीही अद्याप दूरच आहेत.
सायकलची सवय लागणे गरजेचे
युरोपियन देशात सायकलस्वारांसाठी रस्त्यालगत वेगळा ट्रॅक असतो. जास्तीत जास्त लोकांनी तंदुरूस्तीसाठी आणि इंधन बचत तसेच पर्यावरणाचे प्रदूषण टाळण्यासाठी पावलोपावली लागणारी दुचाकी सोडून सायकलची सवय लावून घेणे गरजेचे आहे, असे मत डाॅ. विटेकर व्यक्त करतात.
कोटसाठी
मी ‘हेल्थ काॅन्शस’ आहे. त्यामुळे फिटनेससाठी सायकल उत्तम आहे. रूग्णालयातून फोन आला तर चारचाकी नेल्यानंतर लावायची कुठे, हा प्रश्न उभा राहतो. पण सायकलवरून जाताना ही समस्या येतच नाही. त्याचबरोबर हवेचे प्रदूषण टाळणे आणि इंधनाची बचत हेही यामुळे साध्य होते. - डाॅ. ज्ञानेश विटेकर, जनरल सर्जन, जिल्हा रूग्णालय, रत्नागिरी
कोरोनासाठी आरोग्यकवच
कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे, आहारात मोड आलेली विविध कडधान्ये, दूध आदींचा समावेश करत आहेत. मानसिक ताणतणाव बाजूला ठेवून सकारात्मक राहणे, या जीवनशैलीचा अवलंब डाॅ. ज्ञानेश विटेकर करत आहेत.