गॅसधारकांची धावपळ
By Admin | Updated: March 26, 2015 00:13 IST2015-03-25T21:28:35+5:302015-03-26T00:13:16+5:30
मार्च एन्डिंग : पावणेदोन लाख ग्राहक अनुदानासाठी पात्र

गॅसधारकांची धावपळ
रत्नागिरी : गॅसधारकांना केंद्र शासनाच्या सुधारित थेट लाभ हस्तांतरण (डी. बी. टी.) योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधारकार्ड व बँक खाते गॅस एजन्सीशी संलग्न करण्यासाठी केंद्र सरकारने दिलेली मार्चअखेरची डेडलाईन आता संपत आल्याने ग्राहकांची त्यासाठी धावपळ सुरू आहे. आत्तापर्यंत एकूण २,१९,६५७ ग्राहकांपैकी १,७४,२७३ ग्राहकांनी आधारक्रमांक तसेच बँक खाते गॅस एजन्सीशी संलग्न केले आहे. जिल्ह्यात भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, आणि इंडियन आॅईल पेट्रोलियम अशा तीन कंपन्यांच्या एकूण २० एजन्सीज कार्यरत आहेत. या २० एजन्सीचे मिळून एकूण २,१९,६५७ ग्राहक आहेत. अनुदानित गॅस सिलींंडरचे अनुदान बँकेत जमा होण्यासाठी गॅसधारकांना गतवर्षी आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले होते. मात्र, आधारकार्डच्या नोंदणीत अडचणी आल्याने ही थेट लाभ हस्तांतरण योजना राबवताना अनेक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे केंद्र सरकारने आता या योजनेत सुधारणा केली आहे. आता ग्राहकांना बाराही सिलींडर सवलतीच्या दराने मिळणार आहेत. मात्र, त्यासाठी ज्यांची आधारकार्ड नोंदणी अद्याप झालेली नाही वा ज्यांचे बँक खाते अद्याप गॅस एजन्सीशी संलग्न नाहीत, त्यांनी ती मार्चअखेरपर्यंत यापैकी एक तरी संलग्न करावे लागणार आहे तरच त्यांना अनुदानित सिलींडरचा लाभ मिळेल.
मात्र, ३१ मार्चनंतर आधारक्रमांक वा बँक खाते क्रमांक एजन्सीशी संलग्न न झाल्यास त्यांना एप्रिल ते जूनपर्यंत बाजारभावाने सिलींडर घ्यावा लागेल. जूनमध्ये त्यांनी आधारक्रमांक संलग्न केल्यास एप्रिल ते जूनपर्यंतचे अधिक भरलेले पैसे त्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतील. मात्र, जूननंतरही आधारक्रमांक व बँक खाते संलग्न केल्याशिवाय त्या ग्राहकांना ‘डीबीटी’ योजनेचा लाभ मिळणार नाही गॅस एजन्सीशी आधार क्रमांक किंवा बँक खाते संलग्न करण्यासाठी मार्च २०१५ ची मुदत संपत आली आहे. त्यामुळे मार्चपर्यंत आधारक्रमांक किंवा बँक खाते यापैकी एकही ग्राहकक्रमांकाशी संलग्न न झाल्यास जुनपर्यंत वाढीव दराने सिलींडरची खरेदी करावी लागणार आहे. संलग्न झाल्यानंतरच अनुदान बँक खात्यात जमा होणार आहे. मात्र, जुनपर्यंत या दोन्हीही बाबी ग्राहक क्रमांकाशी संलग्न न झाल्यास कायमस्वरूपी खुल्या दराने सिलींडर घ्यावा लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांची धावपळ झाली आहे. २,१९,६५७ ग्राहकांपैकी १,७४,२७३ ग्राहकांनी आधारक्रमांक तसेच बँक खाते ग्राहक क्रमांकाशी संलग्न केले आहे. १,६१,९४३ ग्राहकांनी केवळ आधारक्रमांक संलग्न केले आहेत, तर ३७,१२० ग्राहकांनी बँक खाते ग्राहक क्रमांकाशी संलग्न केले आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू आहे. (प्रतिनिधी)
केंद्रशासनाने मार्चअखेरपर्यंत गॅस क्रमांकांशी आधारक्रमांक अथवा बँक खाते संलग्न करण्याची सवलत गॅसग्राहकांना दिली आहे. यापैकी एक बाब ग्राहक क्रमांकाशी संलग्न केल्यास अनुदानित सिलींडरचा लाभ मिळणार आहे. जूनपर्यंत दोन्ही बाबी संलग्न केल्यानंतर मार्च ते जूनदरम्यानचे अनुदान त्या ग्राहकाच्या खात्यावर जमा होणार आहे. असे न केल्यास जूनपर्यंत वाढीव दराने सिलींडर घ्यावा लागणार आहे. मात्र, जूनपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. तसे न झाल्यास कायमस्वरूपी संबंधित गॅसच्या ग्राहकाला खुल्या दराने सिलींडर घ्यावा लागणार आहे.