रत्नागिरी : बेकायदेशिरपणे गांजा बाळणाऱ्या रिक्षाचालकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून दीड लाखांची रिक्षा आणि २० हजारांचा ०.४७७ ग्रॅम वजनाचा गांजा असा एकूण १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे येथे करण्यात आली.लक्ष्मण रवी नायर (३४, रा. नाचणकर चाळ, मिरजोळे, रत्नागिरी) असे रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हवालदार गणेश सावंत यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी सायंकाळी लक्ष्मण नायर हा मिरजोळे येथे गांजा घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार, पाेलिसांनी त्याठिकाणी सापळा लावला होता. दरम्यान लक्ष्मण नायर हा रिक्षा (एमएच ०८, एक्यू १६६५) घेऊन त्याठिकाणी आला. त्याच्या हालचाली संशयित वाटल्याने पोलिसांनी त्याला थांबवून त्याची चौकशी करुन झडती घेतली. या झडतीमध्ये त्याच्याकडे २० हजारांचा गांजा सापडला. त्याच्याविराेधात एन. डी. पी. एस अॅक्ट १९८५ चे कलम ८ (क), २२ (अ), २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलिस हवालदार शांताराम झोरे, नितीन डोमणे, गणेश सावंत, प्रवीण खांबे व सत्यजित दरेकर यांनी केली.
रत्नागिरीत रिक्षाचालकाकडे सापडला २० हजारांचा गांजा
By अरुण आडिवरेकर | Updated: April 4, 2025 14:10 IST