निवडणुकीनंतर जिल्ह्यात उरलेय ‘चार टक्क्यांची काँग्रेस’

By Admin | Updated: October 20, 2014 22:35 IST2014-10-20T22:09:50+5:302014-10-20T22:35:28+5:30

काँग्रेस ज्यावेळी एकसंघ होती, तोपर्यंत काँग्रेस हा जिल्ह्यातील प्रमुख पक्षांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता

Four percent Congress in the district after the elections | निवडणुकीनंतर जिल्ह्यात उरलेय ‘चार टक्क्यांची काँग्रेस’

निवडणुकीनंतर जिल्ह्यात उरलेय ‘चार टक्क्यांची काँग्रेस’

रत्नागिरी : ज्या काँग्रेसची पूर्वी रत्नागिरीत एकसंघ ताकद होती. त्या ताकदीला गेली अनेक वर्षे उतरती कळा लागली आहे. शिवसेनेचे तत्कालीन नेते नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर ती वाढली. मात्र, त्यानंतर आता पुन्हा काँग्रेसची वाट बिकट झाली आहे. जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्येच्या केवळ ४ टक्के मतदारांनीच काँग्रेसला हात दिला आहे.
काँग्रेस ज्यावेळी एकसंघ होती, तोपर्यंत काँग्रेस हा जिल्ह्यातील प्रमुख पक्षांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता. काँग्रेस भुवन हे जिल्ह्यातील राजकारणाचे एक मुख्य केंद्र होते. मात्र, काँग्रेसपासून राष्ट्रवादी अलग झाली आणि काँग्रेसला अपशकुन झाला. तो त्यानंतर संपलाच नाही. अपवाद फक्त नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर पाच वर्षांचा! या कालावधीत काँग्रेसला थोडेफार चांगले दिवस होते. राणेंच्या प्रवेशानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले आणि जिल्ह्यातील दोन तत्कालीन आमदार काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत ते निवडूनही आले. मात्र, त्यानंतर त्यांच्या यशालाही उतरती कळा लागली आणि एकेक बुरूज काँग्रेसच्या हातून निसटू लागला.
शिवसेनेचे आमदार काँग्रेसमध्ये गेल्याने त्यापुढील प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस शिवसेनेची नंबर १ची राजकीय शत्रू झाली. मात्र, हे शत्रूत्वही फार काळ टिकले नाही. ग्रामपंचायती, त्यानंतर पंचायत समित्या, नगरपरिषदा यामध्ये काँग्रेसची झपाट्याने पीछेहाट झाली. राणेंचा रत्नागिरी जिल्ह्यावर असलेला अंमलही नाहीसा झाला. तो एवढा झाला की, त्यांचे समर्थक तत्कालीन आमदार गणपत कदम आणि सुभाष बने यांनीही शिवसेनेची वाट धरली.
ज्या त्वेषाने राणे यांनी शिवसेनेच्या बुरुजाला सुरुंग लावले, त्याच वेगाने काँग्रेसच्या यशाला ठिगळं पडू लागली. या विधानसभा निवडणुकीत तर काँग्रेसच्या संपूर्ण जिल्ह्यातील मते ५३ हजार ९७४ इतकी घसरली. पाठ थोपटायचीच झाली तर मनसेपेक्षा ४५ हजार ६२ मते जास्त! यापेक्षा काँग्रेसची कामगिरी चांगली नाही. गेले काही दिवस काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची घुसमट होऊ लागली आहे. पक्षाचे ‘व्हिजन’ राबवताना अनेक अडचणी येत आहेत. वरिष्ठ पातळीवरून घेतल्या गेलेल्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसल्याने कार्यकर्त्यांमध्येही मरगळ आली आहे. ती एवढी वाढलेय की, त्यामध्ये साद घालूनही पक्षासाठी धावायची ताकद उरलेली नाही.
वाढलेली महागाई, सिलिंडर, गॅस, पेट्रोल डिझेल दरवाढ याचा परिणाम जनतेवर एवढा झाला आणि त्याचा फटका काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मानसिकतेला बसला. यशही वारंवार हुलकावणी देत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे. त्यामुळे कार्यकर्तेच विस्फारू लागले आहेत आणि ही परिस्थिती हाताळणारे जिल्हा नेतृत्वही तेवढे सक्षम नसल्याने काँग्रेस जिल्ह्यात नेतृत्वहीन झाली आहे. त्याचा सर्वाधिक फटका या निवडणुकीत बसला आहे आणि विशेष म्हणजे खुद्द जिल्हाध्यक्षांनाही या निवडणुकीच्या लढाईत भाग घेतल्याने काँग्रेसची स्थिती कळली आहे. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये आलेली ही मरगळ पक्षासाठी आणखी अडचणीची ठरणार आहे. सध्याचा विचार करता जिल्ह्यात १२ लाख ३९ हजार २०१ मतदार आहेत. त्यापैकी या निवडणुकीत ५३ हजार ९७४ एवढी मते जिल्ह्यात काँग्रेसला मिळाली आहेत आणि ही एकूण मतदारांच्या ४.३५ टक्के एवढी आहेत. काँग्रेसची झालेली ही घसरण आताच सावरली नाही, तर पाच वर्षांनंतरच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस वृध्दत्वाकडे गेलेली दिसेल. (प्रतिनिधी)

Web Title: Four percent Congress in the district after the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.