चिपळुणातील पूरपरिस्थिती निवळण्यास सुरुवात; प्रशासनातर्फे मदतकार्य वेगाने सुरु नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 15:59 IST2021-07-23T15:59:27+5:302021-07-23T15:59:42+5:30
पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे परंतु पाणी ओसरले तरी धरणक्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे पुन्हा चिपळूण शहरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चिपळुणातील पूरपरिस्थिती निवळण्यास सुरुवात; प्रशासनातर्फे मदतकार्य वेगाने सुरु नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु असून आता हळूहळू पाणी ओसरत असल्याने मदतकार्याला वेग आला आहे. एनडीआरएफची 2 पथके, आर्मीचे 1 पथक, नौदलाचे 2 पथके, हवाईदलाचे 02 पथके तसेच 15 स्वयंसेवी संस्थांमार्फत बोंटीद्वारे मदत कार्य सुरु आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरु असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. सर्वांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे पंरतु पाणी ओसरले तरी धरणक्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे पुन्हा चिपळूण शहरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सखल भागात व पूर प्रवण भागात राहणाऱ्या नागरिकांनी पुढील काही दिवस प्रशासनाने निश्चित केलेल्या सुरक्षित निवारा स्थळांमध्ये स्थलांतरीत व्हावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. चिपळूण तालुक्यातील आत्तापर्यंत सुमारे 1200 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून त्याठिकाणी भोजन, पाणी व निवासाची व्यवस्था प्रशासनामार्फत करण्यात आली आहेत. वैद्यकीय पथक त्याठिकाणी तैनात करण्यात आले आहे.
चिपळूण तालुक्यात नागरिकांसाठी तयार करण्यात आलेल्या निवारा केंद्राची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
जिल्हा परिषद शाळा पाग मुलांची, पाग, ता.चिपळूण
जिल्हा परिषद शाळा पाग क्र.05, पाग ता.चिपळूण
रिगल कॉलेज कोंड्ये, कोंड्ये ता. चिपळूण
माटे सभागृह कापसाळ ता. चिपळूण
पाटीदार भवन कापसाळ ता.चिपळूण
डीबीजे कॉलेज चिपळूण
पाण्याचे स्त्रोत दुषित झाल्यामुळे विहीरींचे पाणी उकळल्याशिवाय पिण्यासाठी वापरु नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. प्रशासनाच्या वतीने पथक तयार करुन निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याच्या टँकर्सची व्यवस्था प्रशासनामार्फत करण्यात आली आहे.
संपर्क तुटलेल्या भागातील नागरिकांच्या मदतीसाठी वायूदल व नौदलाच्या सहायाने मदत कार्य करण्यात येत आहे.
नागरिकांना काही अडचण असल्यास त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
संजय शिंदे, अपर जिल्हाधिकारी, रत्नागिरी -9422404242
जयराज सूर्यवंशी तहसिलदार चिपळूण- 9890062357
तहसिल कार्यालय चिपळूण 02355-252044
प्रांत कार्यालय चिपळूण-02355-252046