Ratnagiri: राजापुरात पूर ओसरला, जनजीवन पूर्वपदावर
By मनोज मुळ्ये | Updated: July 25, 2023 17:21 IST2023-07-25T17:20:25+5:302023-07-25T17:21:17+5:30
जवाहर चौकातील एसटी वाहतूक सोमवारी सकाळपासून पूर्ववत

Ratnagiri: राजापुरात पूर ओसरला, जनजीवन पूर्वपदावर
राजापूर : तालुक्यात रविवारी रात्रीपासून संततधार पडणाऱ्या पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेला पूर ओसरला आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले आहे. अर्जुना आणि कोदवलीच्या पुराच्या पाण्याने जवाहर चौकात तळ ठोकल्याने रविवारी बंद ठेवण्यात आलेली जवाहर चौकातील एसटी वाहतूक सोमवारी सकाळपासून पूर्ववत सुरू झाली आहे.
तालुक्यातील राजापूर शीळ, गोठणेदोनिवडे, चिखलगाव रस्त्यावरील पाणी ओसरल्याने या मार्गावरील वाहतूकही पूर्ववत सुरळीत सुरू झाली आहे. मात्र, तरीही पुढील दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आल्याने प्रशासन सतर्क आहे. मुसळधार पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला व या पुराच्या पाण्याने जवाहर चौकात धडक दिली होती. गेले पाच दिवस राजापुरात पूरसदृश्य परिस्थिती कायम होती. त्यामुळे प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव, पोलिस निरीक्षक भरत धुमाळ, राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले हे ‘ऑन फिल्ड’ परिस्थितीवर जातीनिशी लक्ष ठेऊन होते.
मात्र, रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला. त्यामुळे या दोन्ही नद्यांच्या पुराच्या पाण्याची पातळी ओसरली आहे. सोमवारपासून दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले असून, जवाहर चौकातील एसटी वाहतूकही सुरळीत सुरू झाली आहे. पूर ओसरताच नगर परिषद प्रशासनाकडूनही शहरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.
तालुक्यात काही पडझडीच्या घटना घडल्या असून, त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदार शीतल जाधव यांनी दिल्या आहेत. धाऊलवल्ली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्रधान मंत्री घरकुल आवास योजनेमधून बांधून पूर्ण झालेल्या सुनंदा कृष्णा तिर्लोटकर यांच्या घरावर कलमाचे झाड कोसळले व त्यांच्या घराचे नुकसान झाले आहे.