पाटगाव नगरीत प्रथमच रंगला चिखलणीचा थरार, नांगरासह उधळली बैलजोडी चौखूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 17:27 IST2018-08-06T17:24:28+5:302018-08-06T17:27:30+5:30
हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत शिट्टीचा इशारा होताच नांगरासह बैलजोडी चौखूर उधळत होती! देवरूखवासियांना पाटगाव नगरीत प्रथमच सामुदायिक चिखलणी व नांगरणी स्पर्धा पाहायला मिळाली.

पाटगाव नगरीत प्रथमच रंगला चिखलणीचा थरार, नांगरासह उधळली बैलजोडी चौखूर
देवरूख : हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत शिट्टीचा इशारा होताच नांगरासह बैलजोडी चौखूर उधळत होती! देवरूखवासियांना पाटगाव नगरीत प्रथमच सामुदायिक चिखलणी व नांगरणी स्पर्धा पाहायला मिळाली.
जय सांबा, पाटगाव ग्रामस्थ मंडळ व भारतीय जनता पार्टी, देवरूख यांच्यावतीने पाटगाव येथे नांगरणी चिखलणी स्पर्धा पार पडली. घाटी बैलजोडी प्रकारात देवळे येथील दिलीप शिर्के यांच्या बैलजोडीने १८ सेकंद ९७ पॉर्इंटमध्ये विहीत अंतर पार करत प्रथम क्रमांकाचा मानकरी होण्याचा मान पटकावला, तसेच विहार कदम (आरवली) द्वितीय व पंकज दळवी (शिंदेआंबेरी) यांच्या बैलजोडीने तृतीय क्रमांक पटकावला.
गावठी बैलजोडी प्रकारात करंबेळे येथील सचिन धावडे यांच्या बैलजोडीने १९ सेकंद १५ पॉर्इंटमध्ये विहीत अंतर पार करत प्रथम क्रमांकाची बाजी मारली आहे. शंकर डोंगरे (साडवली) द्वितीय क्रमांक, तर राजाराम चव्हाण (कडवई) यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
गावठी बैलजोडीमध्ये प्रकारामध्ये साडवलीचे शंकर डोंगरे व करंबेळेचे सचिन धावडे यांच्या बैलजोडीने १९.१५ सेकंदात अंतर कापले. दोन्ही जोड्या एकाच वेळेत आल्यामुळे प्रथम क्रमांकासाठी टॉस उडविण्यात आला. तो करंबेळे यांनी जिंकला.
घाटीमध्ये आरवली येथील विहार कदम व शिंदे आंबेरी येथील पंकज दळवी यांच्या बैलजोडीनेही समान वेळेत अंतर पार केल्याने व्दितीय क्रमांकासाठी टॉस करण्यात आला. यामध्ये विहार कदम हे जिंकले.