फायर स्टेशन रखडले
By Admin | Updated: January 29, 2015 23:40 IST2015-01-29T22:12:41+5:302015-01-29T23:40:00+5:30
रत्नागिरी नगरपरिषद : ६८ लाखांचे काम; दीड वर्ष थांब...

फायर स्टेशन रखडले
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेतर्फे शासकीय निधीतून उभारल्या जाणाऱ्या ‘फायर स्टेशन’ इमारतीचे काम अद्याप रेंगाळले आहे. दीड वर्षापूर्वी सुरू झालेले हे ६८ लाख खर्चाचे काम सहा महिन्यात पूर्ण करायचे असताना मुदत टळल्यानंतरही या इमारतीचे काम अजून अपूर्ण आहे. इमारत कधी होणार व फायर स्टेशनची शहराची गरज कधी पूर्ण होणार, असा सवाल आता नागरिकांतून केला जात आहे. रत्नागिरी शहर हे जिल्ह्याच्या राजधानीचे ठिकाण आहे. याठिंकाणी सर्वच शासकीय खात्यांची जिल्ह्याची मुख्य कार्यालये आहेत. शहराची लोकसंख्या ही एक लाखापर्यंत असून, आजूबाजूचा परिसरही विकसित होत आहे. शहराच्या परिसरातील शेकडो लोक रोज रत्नागिरी शहरात ये - जा करतात. शहर व परिसराची लोकसंख्या पाहता दीड लाखांपेक्षा अधिक आहे. विकासकामांचा वेग वाढल्याने दुर्घटनांचे प्रमाणही वाढले आहे. आगीची दुर्घटना घडल्यास नगरपरिषदेकडे एकच अग्निशामक आहे. तसेच आवश्यक प्रशिक्षित कर्मचारीही सध्या नाहीत. त्यामुळे कंपन्यांचे अग्निशामक दुर्घटना घडलेल्या ठिकाणी बोलवावे लागतात. त्यांना येण्यास वेळ लागतो. परिणामी आग लागलेल्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मोठ्या आगीच्या दुर्घटनेवेळी जवळ असलेल्या नगरपरिषदेच्या एकाच अग्निशामकाला आग विझविण्याचे काम सुरूवातीला एकाकी करावे लागते. ही स्थिती बदलण्यासाठी व मालमत्तांचे रक्षण होण्यासाठीच रत्नागिरी शहरात नगरपरिषदेचे फायर स्टेशन होण्याबाबतचा विचार पुढे आला. त्यातून पाठपुरावा करताना या प्रकल्पाला मान्यता मिळाली. काम सुरू झाले. मात्र, सहा महिन्यांचे काम दीड वर्ष झाले तरी पूर्ण न झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
शहराला लागूनच मिरजोळे औद्योगिक वसाहत आहे. शहराच्या हद्दवाढीचा प्रस्तावही शासनाकडे सादर झाला आहे. हद्दवाढीच्या पार्श्वभूमीवर लागणारे अतिरिक्त पाणी बावनदीतून मिळावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाणी आरक्षणाची मागणी करणारा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरी शहर व परिसराला महत्त्व प्राप्त झाले आहे.
विस्ताराबरोबरच विकासातही रत्नागिरी शहर आता प्रगतीपथावर असताना आग लागणे वा अन्य दुर्घटनांमध्येही गेल्या तीन ते चार वर्षात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेचे स्वत:चे फायर स्टेशन असणे हा महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. त्यातूनच दोन वर्षांपूर्वी या फायर स्टेशनला मंजुरी मिळून निधीही मंजूर झाला. त्यानंतर इमारतीचे काम प्रत्यक्षात आॅगस्ट २०१३मध्ये सुरू करण्यात आले.
इमारत बांधकाम पूर्णत्वासाठी सहा महिन्यांची मुदत होती. मात्र, हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. सध्या सुमारे ८० टक्केच काम झाले आहे. काम पूर्ण न होण्यामागील नेमकी कारणे काय, हे शोधून त्याबाबत उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे. (प्रतिनिधी)
इमारतीचे बांधकाम पूर्ण कधी होणार?
कंपन्यांचे अग्निशामक मदतीला
रत्नागिरी नगरपरिषदेकडे सध्या स्वत:चा अग्निशामक आहे. मात्र, ही यंत्रणा पुरेशी नसल्याचे वारंवार स्पष्ट झाले. अनेकदा नगरपरिषदेच्या अग्निशामकाबरोबरच फिनोलेक्स व जिंदाल कंपनीचे अग्निशामक मागवण्याची गरज निर्माण होते. वाढते शहरीकरण व त्याचबरोबरीने वाढणाऱ्या दुर्घटना पाहता रत्नागिरी नगरपरिषदेच्या या फायर स्टेशनची इमारत लवकरात लवकर पूर्ण होण्याची गरज असून, त्यातील अडसर दूर करण्याची मागणी होत आहे.
दोन अग्निशामक गाड्या १४ कर्मचारी, अधिकारी
नगरपरिषदेच्या या फायर स्टेशनमध्ये दोन अग्निशामक गाड्या असतील. तसेच यातील प्रत्येक गाडीवर चार कर्मचारी काम करणार आहेत. एक फायर स्टेशन अधिकारी व अन्य आवश्यक कर्मचारी असे एकूण १४ कर्मचारी या स्टेशनचे काम पाहणार आहेत. मात्र, इमारतीचे कामच रखडल्याने हा प्रकल्प अद्याप रखडलेला आहे.