चिपळुणातील पडीक इमारतीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:31 IST2021-04-11T04:31:14+5:302021-04-11T04:31:14+5:30
चिपळूण : येथील पोलीस ठाण्याजवळ व पोलीस निरीक्षक निवासस्थानासमोरील एका बंद आणि पडीक इमारतीला शनिवारी दुपारी अचानक आग लागली. ...

चिपळुणातील पडीक इमारतीला आग
चिपळूण : येथील पोलीस ठाण्याजवळ व पोलीस निरीक्षक निवासस्थानासमोरील एका बंद आणि पडीक इमारतीला शनिवारी दुपारी अचानक आग लागली. नगर परिषदेच्या अग्निशमन बंबाच्या साहाय्याने ती त्वरित विझवण्यात आली. त्यामुळे मोठे नुकसान टळले आहे.
शहरातील बुरुमतळी येथील पोलीस स्थानकासमोर ही इमारत आहे. गेल्या काही वर्षापासून ती बंद अवस्थेत आहे. पडीक इमारतीच्या छतावर झाडाचा पालापाचोळा साचला होता. त्यामुळे ही आग आणखी भडकली. ती आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रस्त्यावरून निघालेल्या एका पादचाऱ्याने इमारतीला आग लागल्याचे पाहिले. त्याने थेट सायकलवरून नगर परिषदेत धाव घेत घटनेची माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत पोलीसही घटनास्थळी आले होते. बंबाच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली गेली.
या बंद इमारतीस लागून एक झेरॉक्स सेंटर आहे. लॉकडाऊनमुळे ते बंद होते. आग त्वरित विझवण्यात आल्याने या झेरॉक्स सेंटरला धोका पोहोचला नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम, नगरसेवक परिमल भोसले, पोलीस कर्मचारी, नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले होते.