स्त्रियांच्या न्यायासाठी ‘तिचा’ संघर्षाचा लढा

By Admin | Updated: October 18, 2015 23:57 IST2015-10-18T22:10:21+5:302015-10-18T23:57:48+5:30

राजश्री पाटणे : अन्यायग्रस्त महिलांच्या पाठी बळकट हातांची शक्ती--नारीशक्तीला सलाम

Fighting for her 'struggle' for women's justice | स्त्रियांच्या न्यायासाठी ‘तिचा’ संघर्षाचा लढा

स्त्रियांच्या न्यायासाठी ‘तिचा’ संघर्षाचा लढा

शिवाजी गोरे-- दापोली--समाजात महिलांना सन्मानाने जगता यावे, कोणत्याही स्त्रीवर अन्याय होऊ नये, यासाठी गेली २० वर्षे खेड तालुक्यातील भरणे येथील राजश्री शैलेश पाटणे या संघर्ष करीत आहेत. महिलांची कोणतीही समस्या असो; त्या तिच्या हाकेला धावून जातात. आजपर्यंत अनेक महिलांना न्याय मिळवून देऊन त्यांनी नारी शक्तीचा आदर्श समाजाला घालून दिला
आहे.सामाजिक कार्यकर्त्या राजश्री पाटणे यांचे माहेर मुंबई आहे. शालेय जीवनापासूनच त्यांना अन्यायाविरुद्ध चीड आहे. मुंबईमध्ये महिलांवरील अन्याय अत्याचार त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहेत. समाजातील महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार दूर व्हावेत, यासाठी त्यांनी शालेय जीवनापासून महिलांसाठी कार्य करायला सुरुवात केली. लग्नानंतर आपल्या संघर्षमय जीवनाला पूर्णविराम मिळेल असे वाटत असतानाच कुटुंबातील व्यक्तीशी तात्विक मतभेद सुरु झाले. प्रगल्भ विचारांच्या राजश्री पाटणे यांना कुटुंबाने काही बंधने घालायला सुरुवात केली. परंतु शालेय जीवनात समाजसेवेचे बाळकडू प्यायल्यामुळे त्यांच्यातील सामाजसेवेची वृत्ती गप्प बसू देत नव्हती.
कुटुंबाने घालून दिलेली बंधने झुगारुन देत कुटुंबाचा व समाजाचा रोष पत्करून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कुंपणाबाहेर पडणे पसंत केले. त्यामुळे संसारात अनेक चढउतार आले. परंतु पतीची समर्थ साथ लाभल्याने तिला हत्तीचे बळ मिळाले. त्यातूनच महिलांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तिने रणरागिणीचा अवतार घेऊन समाजातील विकृत व बुरसटलेल्या विचारांवर प्रहार करून पुरुषी एकाधिकारशाही विरोधात रणशिंग फुंकले. आजपर्यंत अनेक महिलांचे तुटलेले संसार जुळवून सामाजिक, कौटुंबिक अत्याचारातून मुक्त केले आहेत. घटस्फोटीत, अत्याचारीत महिलांना राजश्रीतार्इंचा आधार वाटतो.
एखाद्या महिलेचा पती बाहेरगावी असेल तर समाज त्या महिलेकडे वाईट नजरेने बघतो. त्यातच पतीसुद्धा संशयी वृत्तीचा असेल, तर त्या महिलेने जगायचे कसे? खेड येथे एका महिलेबाबत असाच प्रकार घडला. बाहेरगावी राहणारा नवरा बायकोला तलाक देत नव्हता व तिच्याशी संसारसुद्धा करायला तयार नव्हता. तिचा लग्नाचा खर्च मिळावा, अशी त्या महिलेची मागणी होती. परंतु तिचा पती दाद देत नव्हता. त्याच्याकडून तिचा सर्व खर्च वसूल करून तिला न्याय मिळवून दिला.
महिलांवरील अत्याचाराविरोधात लढणे; हा एकमेव मुद्दा नसून, अत्याचारीत महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना प्रशिक्षीत करून स्वयंरोजगाराकडे वळविणे, घटस्फोटित, निराधार, विधवा महिलांना रोजगार मिळवून देणे, त्यांचे समुपदेशन करणे, महिलांनी समाजाकडून होणाऱ्या अत्याचाराचा प्रतिकार कशा प्रकारे केला पाहिजे, यासाठी त्या महिलांमध्ये जागृती निर्माण करण्याचे काम करीत आहेत.

1भरणे शहरामध्ये रसिका पाटणे नावाच्या महिलेचे झुणका भाकर केंद्र होते. ते बंद पडल्याने उपजीविकेसाठी तिने भाजी दुकान सुरु केले. परंतु राजकीय सुडापोटी त्या झुणका भाकर केंद्रात तिला भाजी विकण्यास मनाई करण्यात आली होती. त्या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी राजकीय झुगाराला धुडकावून लावत मला हात लावून दाखवा, असे चॅलेंज दिले. या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी १ महिना तिचे भाजीचे दुकान चालवले. अखेर त्या महिलेला न्याय मिळवून दिला. आज ती महिला त्याच ठिकाणी भाजी विकून उदरनिर्वाह करत आहे.


2गावातील तंटामुक्त समिती, महिला दक्षता समितीच्या माध्यमातून अनेक महिलांचे संसार जोडण्याचे काम सुरु आहे. स्त्रियांवर होणारे अत्याचार, कौटुंबिक अत्याचार यावर न्याय मिळवून देण्यासाठी धडपड कायम आहे.
3महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडताना समोरच्या रोषाला बळी पडावे लागते. परंतु माझी भूमिका सत्याची आहे. सत्याला न्याय देण्यासाठी मी कधीही घाबरणार नाही. कितीही मोठे संकट आले तरी चालेल म्हणून त्या आपले कार्य अविरतपणे करीत आहेत.
4कुटुंबातील व्यक्तीकडून पतीची फसगत होऊन बेघर करण्यात आले. आता जायचे कुठे? हा प्रश्न निर्माण झाला. परंतु पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून कुटुंबातील व्यक्तीच्या जुलूमाविरोधात लढा दिला. कुटुंबातील व्यक्तीविरोधातील लढ्यातून अन्यायाविरोधात लढण्याचे बळ मिळाले. संघर्ष हेच जीवन मानून कधीच मागे वळून पाहिले नाही. समाजसेवा करताना राजकारणाची आवड निर्माण झाली होती. परंतु गलिच्छ राजकारण्यांमुळे राजकारणाची चीड येऊन राजकीय संन्यास घेतला. त्यानंतर त्यांनी स्वत:ला समाजकारणात गुंतवून घेतले.



5लोटे एमआयडीसी येथील एका कंपनीने १५० कर्मचाऱ्यांना कमी केल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करण्यात आले. त्यामुळे जेलसुद्धा पत्करावी लागली. परंतु अखेर कामगारांना न्याय मिळाला. आम्ही केलेल्या आंदोलनाला यश आले.
6कौटुंबिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना आधार देऊन त्यांना सन्मानाने जगण्यासाठी नामवंत कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रोजगार मिळवून दिला आहे. त्यामुळे अनेक महिलांचे आयुष्य सुसह्य झाले आहे.

Web Title: Fighting for her 'struggle' for women's justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.