क्रीडाशिक्षकाचं क्षेत्रही महिलांकडून पादाक्रांत
By Admin | Updated: October 18, 2015 00:21 IST2015-10-18T00:14:02+5:302015-10-18T00:21:47+5:30
संध्या सावंत : अपेक्षा आॅलिंपिकची मात्र सुविधांचा अभाव

क्रीडाशिक्षकाचं क्षेत्रही महिलांकडून पादाक्रांत
मेहरुन नाकाडे, रत्नागिरी : खेळात महिला पुढे असल्या तरी खेळ शिकवण्यासाठी शाळेत क्रीडा शिक्षिका असल्याचे खूप अभावानेच आढळतं. मुळात हे काम आपल्याला जमेल की नाही, हा मानसिक संघर्षच मोठा असतो. खेळ शिकवण्याचं कामही महिला लीलया पेलू शकते, ही बाब इतरांना पचवायलाही थोडी अवघडच. पण मूळच्या संध्या सावंत आणि आताच्या प्रणाली शितोळे यांनी क्रीडाशिक्षिक म्हणून सातत्यपूर्ण कामाचा ठसा उमटवला आहे.
वडील तलाठी असल्यामुळे सातत्याने होणारी बदली व त्यामुळे विविध गावांतून राहण्याचा योग आला. शाळेत असल्यापासूनच खेळाची आवड होती. विविध स्पर्धांतून सहभागी होण्याची संधी मिळाली. देवरूख येथे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बीपीएडच्या पदवी अभ्यासक्रमासाठी वडाळा (मुंबई) येथे प्रवेश घेतला. त्यानंतर रत्नागिरीत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्याचदरम्यान सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये क्रीडा शिक्षिका म्हणून रूजू झाले., असे त्या सांगतात. संध्या सावंत या लंगडी, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, अॅथलेटिक्सच्या पंचपरीक्षा उत्तीर्ण आहेत. खेळाची आवड असली तरी क्रीडाशिक्षिकांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. बहिणीच्या पाठिंब्यामुळेच क्रीडा शिक्षिका झाल्याचे त्या सांगतात.
जिल्ह्यात दहा ते बाराच क्रीडाशिक्षिका कार्यरत आहेत. दिवसभर उन्हात राहून मुलांना खेळाचे प्रशिक्षण देणे, जिल्ह्यांतर्गत, विभागीय, राज्य स्पर्धांसाठी संघ घेऊन जाणे, मुलांइतकाच किंबहुना मुलांहून अधिक सरावात सहभाग दर्शवणे अशा गोष्टी साध्यासोप्या नसल्याने क्रीडा शिक्षिकांची संख्या कमी होती. पण संध्या सावंत यांनी त्या काळातही ही बाब सिद्ध करून दाखवली. शिक्षिकांची संख्या खूप मोठी असली तरी क्रीडाशिक्षिकांची संख्या मात्र अजून मर्यादीतच आहे. अर्थात त्याची सुरूवात करणाऱ्यांमध्ये संध्या सावंत यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाईल, हेही तितकेच खरे.