फासकीत सापडल्याने बिबट्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 17:42 IST2020-01-18T17:41:31+5:302020-01-18T17:42:52+5:30
संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील कालभैरव मंदिराजवळील नदीतील कातळात शनिवारी सकाळी मृतावस्थेत बिबट्या आढळून आला. फासकीत सापडल्याने या बिबट्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

फासकीत सापडल्याने बिबट्याचा मृत्यू
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील कालभैरव मंदिराजवळील नदीतील कातळात शनिवारी सकाळी मृतावस्थेत बिबट्या आढळून आला. फासकीत सापडल्याने या बिबट्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
शनिवारी सकाळी कालभैरवमंदिराशेजारील स्मशानभूमी जवळील अलकनंदा नदीवर काही महिला कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना हा बिबट्या दिसला. बिबट्याला पाहताच महिला घाबरून गेल्या. परंतु बिबट्या काहीच हालचाल करीत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी जवळ जाऊना पाहिले असता तो मृतावस्थेत आढळला. या बिबट्याच्या कमरेकडील भाग कापल्यासारखा दिसत होता.
काही महिलांनी बोरसुतकर गुरुजी यांना याबाबत माहिती दिली. बोरसुतकर यांनी प्रत्यक्ष जाऊन खात्री केली असता बिबट्याच्या कमरेला वायरीचा फास आवळलेला दिसला. कमरेत फास आवळल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच बोरसुतकर यांनी कसबा वाडा ठिकाणचे पोलीस पाटील नंदकुमार शा. बोंडकर यांना माहिती दिली.
पोलीस पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करुन वनअधिकारी व संगमेश्वर पोलिसांना माहिती दिली.