शेतकरी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:28 IST2021-03-22T04:28:09+5:302021-03-22T04:28:09+5:30

ममता शिंदे यांचा सत्कार दापोली : तालुका पंचायत समिती उपसभापती ममता शिंदे यांनी अल्पावधीतच राजकीय क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याची ...

Farmers meet | शेतकरी मेळावा

शेतकरी मेळावा

ममता शिंदे यांचा सत्कार

दापोली : तालुका पंचायत समिती उपसभापती ममता शिंदे यांनी अल्पावधीतच राजकीय क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांचा नाभिक समाज संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण चव्हाण, कार्याध्यक्ष महादेव चव्हाण, तालुकाध्यक्ष मंगेश शिंदे, सचिव शैलेश चव्हाण, संदीप चव्हाण आदी उपस्थित होते.

मासळी मार्केट ओस

रत्नागिरी : तालुक्यातील खंडाळा येथे मासळी विक्रेत्यांसाठी बंदिस्त शेड बांधण्यात आले आहे. मात्र मासळी विक्रीसाठी विक्रेते तेथे न बसता, मुख्य बाजारपेठेत बसूनच विक्री करीत आहेत. रस्त्यालगत बसून मासळी विक्री करीत असल्याने होणारी गर्दी, वाहतूक कोंडी याचा विचार करता, मासळी विक्रीसाठी मार्केट बांधण्यात आले आहे, मात्र त्याचा वापर होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.

निवृत्तीवेतन अनियमित

राजापूर : जिल्हा परिषद सेवेतील वयोवृध्द सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन अनियमित पध्दतीने वितरित करण्यात येत असल्याने राजापूर तालुका सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समितीने थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सदस्यांची कैफियत मांडली आहे. फेब्रुवारी महिन्याची पेन्शन अद्याप जमा करण्यात आलेली नाही. दरमहा एक ते पाच तारखेपर्यंत सेवानिवृत्ती वेतन अदा करण्याचे शासकीय परिपत्रक असताना, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

रस्त्याची दुरवस्था

दापोली : तालुक्यातील करंजाळी-पावनळ-कात्रण रस्ता पूर्णत: उखडला आहे. खराब रस्त्याचे कारण देत या मार्गावरील एस.टी. सेवा बंद पडण्याची भीती ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. खड्डयांतून वाहन चालविताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.

आजपासून लसीकरण

चिपळूण : तालुक्यातील अडरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवार दि. २२ फेब्रुवारीपासून कोविशिल्ड लसीकरण सुरू होणार आहे. दर सोमवार, बुधवार, शुक्रवारी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० पर्यंत ४५ ते ५९ वर्षांतील नागरिकांना तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे. लसीकरणासाठी येणाऱ्यांकडे आधारकार्ड किंवा मतदान कार्ड असणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांचा सत्कार

दापोली : तालुका पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे विस्तार अधिकारी विजय बाईत यांच्या अध्यक्षतेखाली गुणवंत विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. गतवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या यशराज पाटील, वेदश्री सुर्वे यांनाही गाैरविण्यात आले. आभारप्रदर्शन सुधाकर गायकवाड यांनी केले.

नेत्र तपासणी शिबिर

रत्नागिरी : संपर्क युनिक फाैंडेशन, नंदादीप नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २७ मार्च रोजी नेत्रदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मेस्त्री हायस्कूलच्या प्रवेशद्वाराजवळील गाळा क्रमांक १ मध्ये सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० या वेळेत शिबिर होणार आहे. शिबिराला येणाऱ्या सर्वांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करून तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे.

कांद्याच्या दरात घट

रत्नागिरी : कांद्याच्या दरात घट झाली असून २० ते २२ रुपये किलो दराने कांदा विक्री सुरू आहे. काही ठिकाणी ५० रुपयास तीन किलो दराने कांदा विक्री सुरू आहे. दैनंदिन स्वयंपाकासाठी कांद्याचा वापर सर्रास केला जातो. मात्र कांद्याच्या वाढत्या दरामुळे ग्राहक मेटाकुटीस आले होते. मात्र दर खाली आल्याने ग्राहकांमध्ये समाधान वक्त होत असून आणखी दर खाली यावेत, अशी मागणी होत आहे.

Web Title: Farmers meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.