अतिरिक्त विभागाची सुरुवातच निकृष्ट

By Admin | Updated: December 25, 2015 00:11 IST2015-12-24T21:53:03+5:302015-12-25T00:11:57+5:30

लोटे एमआयडीसीत कामाला प्रारंभ : महावितरणच्या सबस्टेशनच्या कामाचा दर्जा ढासळला

Extra section begins with the worst | अतिरिक्त विभागाची सुरुवातच निकृष्ट

अतिरिक्त विभागाची सुरुवातच निकृष्ट

आवाशी : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड तालुक्यातील लोटे - परशुराम औद्योगिक वसाहतीच्या अतिरिक्त विभागाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. दोन महिन्यांपूर्वी सुरू केलेले येथील महावितरणच्या सबस्टेशनचे काम निकृष्ट दर्जाचे असून, यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पंचक्रोशीतील नागरिकांतून केला जात आहे.साधारणपणे पस्तीस वर्षांपूर्वी या महामार्गालगतच्या माळरानावर रासायनिक कारखानदारी उभी राहिली. पहिल्या टप्प्याला मागील दहा वर्षांपूर्वी जोर धरल्याचे दिसून आले. मात्र, त्यानंतर अंतर्गत युनियन, पक्षीय युनियन, कंपनी मालकांचे आडमुठे धोरण, प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प केंद्रातील घोटाळे व त्यामुळे होणारे प्रदूषण अशा विविध कारणांनी पहिला टप्पा राजकीय पटलावर आला. याचा काही राजकीय पक्षांसह काही कारखानदारांनी फायदा घेतला तर काहींनी उत्पादनच बंद केले.
मात्र, असे असले तरी त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या सबसिडीचा लाभ घेऊनच त्यांनी आपल्या कारखान्यांना कुलूप ठोकले. जागतिक मंदीचा फटका येथीलही कारखानदारीला बसत असून, बहुतेकजणांचे उत्पादन मागणी नसल्याने बंद करावे लागत आहे. बावीस वर्षांपूर्वी येथीलच नऊ गावांची संपादित केलेली सोळाशे हेक्टर जमीन एमआयडीसीच्या ताब्यात आहे. काही महिन्यांपूर्वी येथील शेतकऱ्यांचा सर्व प्रकारचा मोबदला अदा करुन तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या क्षेत्रावर विनारसायन कारखानदारी आणण्याचे गाजर इथल्या जनतेला दाखवले. सुरुवातीलाच एचपीसीएलसारखा नामांकित प्रकल्प येथील नागरिकांनी विरोध करून हद्दपार केला. आता खासदार अनंत गीते यांच्या प्रयत्नांतून शेकडो कोटीचा पेपर उद्योग कारखाना व कोकाकोला हे प्रकल्प येऊ घातले आहेत. त्यांचे येथील नागरिकांनी स्वागतही केले. मात्र, त्या प्रकल्पांची अद्याप काहीच हालचाल दिसून येत नाही. मात्र वीज, पाणी, रस्ते या कामांपैकी मुख्य दोन कामे सुरु झालेली दिसून येत आहेत. पैकी लवेल येथील पेट्रोलपंपासमोर मागील तीन महिन्यांपासून महावितरणचे सबस्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे. मुंबईस्थित हायटेक प्रा. लि. या कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला आहे.
सध्या खोदकाम सुरू असून काही ठिकाणी जमिनीच्यावर बांधकामही करण्यात आले आहे. हे काम इतके निकृष्ट दर्जाचे आहे की, इमारतीच्या पायाला म्हणतात काळा दगड (डबर) व नैसर्गिक जांभ्याचे तुकडे टाकून त्याला माती व ग्रीटच्या सहाय्याने भराव केला जात आहे. त्याचबरोबर जेथे आरसीसी इमारत उभी राहणार आहे, त्या इमारतीचा पाया व कॉलममध्ये वापरण्यात येणारे स्टीलही हलक्या दर्जाचे आहे, असा आक्षेप पुढे येत आहे.
त्यामुळे अतिरिक्त दुसऱ्या टप्प्याची सुरुवातच निकृष्ट दर्जाची असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांमधून केला जात आहे.
हे काम सुरु झाल्यापासून एमआयडीसी वा महावितरणचा एकही अधिकारी कामाची पाहणी करण्यासाठी फिरकलेला नाही. त्याचबरोबर मुंबईस्थित हायटेक कंपनीनेदेखील अन्य ठेकेदार नेमून त्यांच्या अंतर्गत उपठेकेदाराकरवी हे काम केले जात आहे. त्यामुळे विजेसारख्या जबाबदार कामात असा भ्रष्टाचार चालला असेल तर येणारे कारखानदार येथे येण्यास धजावतील का? असा प्रश्न स्थानिक उपस्थित करत आहेत. साहजिकच महावितरणने ही सुरुवात केली असेल तर दुसरीकडे त्याच प्रकल्पासाठी नेण्यात येणारी पाण्याच्या लाईनचेही काम कितपत दर्जात्मक केले जात असेल? अशी शंका उपस्थित केली जात आहे. एमआयडीसीच्या अतिरिक्त कामाचा दर्जा चांगला राखणे गरजेचे असून, याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)



हे काम आमच्या जिल्हास्तरीय समितीअंतर्गत येत असून, त्यावर आमच्या खेड डिव्हीजन असिस्टंट इंजिनिअर एम. एम. गवारी हे देखरेख करत असतात, मात्र, अशा प्रकारची तक्रार त्यांनी अद्याप केलेली नाही, तरीही मी स्वत: या कामाच्या दर्जाबाबत आमचे सुप्रिंडेंट, रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधणार आहे. संबंधित ठेकेदार म्हणजेच हायटेक कंपनीचे प्रोजेक्ट हेड यांना बोलावून घेऊन चुकीचे काम करत असल्यास ते बंद करू, आम्ही चुकीच्या कामाचे कधीही समर्थन करणार नाही.
- एस.पी. नागठाणे, उपकार्यकारी अभियंता, खेड, महावितरण.


सद्यस्थितीत महिनाभर हे काम बंद आहे. मात्र, दोन महिन्यात मी तीनवेळा या कामावर भेट दिली. माझ्या निदर्शनास अशी कोणतीही बाब आली नसून, तुम्हाला जे कळले आहे, त्याची खात्री करण्यासाठी तुम्ही मला माझ्या खेड येथील कार्यालयात भेटायला या, मग आपण चर्चा करू. मात्र, काम दर्जेदार होत नसेल तर ते बंद करू.
- एम. एम. गवारी, असिस्टंट इंजिनिअर, महावितरण.


‘लोकमत’च्या निदर्शनास आलेली व स्थानिकांनी दाखवून दिलेली बाब खरी असली तरी दिलेल्या कालावधीत काम करण्यासाठी आम्ही बांधिल आहोत, मात्र, कामाच्यावेळी रेती उपलब्ध होत नव्हती, म्हणून आम्ही काही प्रमाणात ग्रीट वापरली आहे. त्याबाबत मी पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्याशी बोलणार होतो. मात्र, ते कारण त्यांनी समजून घेतले असते तर ठीक. भरावाच्या कामात डबरबरोबर नैसगिक दगडगोट्यांचा वापर केला असेल तर ते चुकीचे आहे. मी येत्या दोन दिवसात येऊन पाहणी करेन व तसे होऊ देणार नाही. त्याचबरोबर आमचे रत्नागिरीतील आर्किटेक्ट (नाव माहीत नाही) यांनी दिलेल्या प्लॅनप्रमाणेच आम्ही आरसीसी कामाला योग्य तेच स्टील वापरत आहोत, याची त्यांनाही कल्पना आहे. तरीही माझ्यापश्चात त्यात तांत्रिक चुका घडत असतील तर प्रत्यक्ष पाहणी करुन ते सुधारण्याचे काम केले जाईल. - हर्षद परब, प्रोजेक्ट हेड, हायटेक कंपनी



समन्वयाचा अभाव : कामाची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे
याठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली असता महावितरण व ठेकेदाराच्या कामकाजाबाबत समन्वय नसल्याचे दिसून येत असून, यात आढळणाऱ्या विसंगतीमुळे याची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे असल्याचे दिसत आहे. त्यानंतरच कामाचा दर्जा सर्वांच्या लक्षात येईल.


पाण्याच्या लाईनचे काय?
याठिकाणी होणाऱ्या प्रकल्पासाठी सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याच प्रकल्पासाठी नेण्यात येणाऱ्या पाण्याच्या लाईनचेही काम कितपत दर्जात्मक केले जात असेल? अशी शंका आता ग्रामस्थांनी उपस्थित केली आहे.

Web Title: Extra section begins with the worst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.