रत्नागिरी जिल्ह्यातील १९ आरोग्यसेविकांना मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:38 IST2021-09-10T04:38:34+5:302021-09-10T04:38:34+5:30
रत्नागिरी : कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत असतानाच जिल्ह्यातील १९ कंत्राटी आरोग्यसेविकांची पदे रद्द करण्यात आली ...

रत्नागिरी जिल्ह्यातील १९ आरोग्यसेविकांना मुदतवाढ
रत्नागिरी : कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत असतानाच जिल्ह्यातील १९ कंत्राटी आरोग्यसेविकांची पदे रद्द करण्यात आली होती. त्याचे पडसाद सर्वत्र उमटल्याने अखेर राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या अतिरिक्त संचालकांकडून या कंत्राटी आरोग्यसेविकांना सेवेतच ठेवण्यात आल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाला आदेश देण्यात आले आहेत.
एनआरएचएमअंतर्गत जिल्ह्यात १९ कंत्राटी आरोग्यसेविकांची नियुक्ती जिल्हा परिषदेकडून प्राथमिक आराेग्य केंद्रांमध्ये देण्यात आली होती. गेली १० ते १२ वर्षे या आरोग्यसेविका प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये बाधितांची काळजी घेतली होती. तरीही शासनाकडून त्यांना अचानकपणे नोकरीवरुन कमी करण्यात येत असल्याचे आदेश देण्यात आले होते.
एनआरएचएम अंतर्गत काम करणाऱ्या या कंत्राटी आरोग्य सेविकांचे मानधनाची रक्कम केंद्र शासनाकडून आलेली नसल्याने अतिरक्त अभियान संचालकांकडून सर्व जिल्हा परिषदांना त्यांना दि. १ सप्टेंबरपासून कमी करण्याचे आदेश देण्यात आले होते. तरीही जिल्हा परिषदेकडून त्यांना काम थांबवण्याच्या कोणत्याही सूचना देण्यात आल्या नव्हत्या. मात्र, कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून जाहीर करण्यात आलेले असतानाही शासनाकडून नोकरीतून कमी करण्याचे आदेश आल्याने त्या आरोग्यसेविकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.
दरम्यान, आराेग्यसेविकांना अचानक कमी करण्याच्या आलेल्या आदेशामुळे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून तसेच जनतेमधूनही संताप व्यक्त करण्यात येत होता. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडूनही नाराजीचा सूर उमटला होता. अखेर एनआरएचएम विभागाला आपले आदेश मागे घ्यावे लागले. त्यामुळे गणेशोत्सवाच्या कालावधीत त्यांना मुदतवाढ मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.