गावविकासासाठी विस्तार अधिकारी

By Admin | Updated: July 18, 2016 00:02 IST2016-07-18T00:02:02+5:302016-07-18T00:02:19+5:30

शिक्षण विभाग : इतर खात्यांचे अधिकारी गुरुजी

Extension Officer for Rural Development | गावविकासासाठी विस्तार अधिकारी

गावविकासासाठी विस्तार अधिकारी

रत्नागिरी : शैक्षणिक विकासाच्या नावाखाली इतर खात्याच्या अधिकाऱ्यांना गुरुजींची भूमिका निभावावी लागत असतानाच दुसरीकडे शिक्षण विभागातील विस्तार अधिकाऱ्याना गाव विकास आराखड्यासाठी जुंपण्यात आले आहे.
शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. एक दिवस शाळेसाठी या उपक्रमाची जोरदार चर्चा होत आहे. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही विद्यार्थ्यांमध्ये जाऊन अध्यापनाचे पवित्र काम केले. त्यानंतर वर्ग-१ व वर्ग-२ चे अधिकारी शाळेवर जाणार असताना काही शाळांमध्ये तलाठ्यांनाही धाडण्यात आले होते.
सर्वच ग्रामपंचायतींमध्ये आमचा गाव, आमचा विकास हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये चौदाव्या वित्त आयोगाअंतर्गत गावचा पुढील चार वर्षांचा आराखडा बनवला जात आहे. त्यादृष्टीने गाव पातळीवर सर्वच विकासकामे करण्यात येणार आहेत. त्यामध्ये गावातील साकव, रस्ते बंधाऱ्यांसह अन्य कामांचाही समावेश आहे. तयार करण्यात येणारा विकास आराखडा ग्रामसभेमध्ये मंजूर करण्यात येणार आहे.
शिक्षकांवर अविश्वास दाखवून एक दिवस शाळेसाठी उपक्रम सुरू करून शिक्षण विभागातील वातावरण गढूळ झाले आहे. त्यामुळे शिक्षकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच आता प्रशासनाकडून शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांवर आणखी एक जबाबदारी देण्यात आली आहे. शैक्षणिक काम करीत असताना गावच्या विकासाचे ओझेही विस्तार अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. एकीकडे शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी अन्य खात्याच्या अधिकाऱ्यांना शैक्षणिक काम दिले जात असतानाच शिक्षण खात्यातील विस्तार अधिकाऱ्यांना शैक्षणिक काम बाजूला ठेवून गाव विकास आराखड्याचे काम देण्यात आले आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे ५६ विस्तार अधिकारी विकास आराखडा तयार करण्यासाठी जुंपण्यात आले आहेत. त्यामुळे इतर खात्याच्या अधिकाऱ्यांना शैक्षणिक काम द्यायचे आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना अशैक्षणिक कामे देऊन शासन नक्की काय साध्य करणार आहे, अशी जोरदार चर्चा शैक्षणिक क्षेत्रात सुरु आहे. (शहर वार्ताहर)
 

Web Title: Extension Officer for Rural Development