कोकणात रुजलाय जगातील सर्वात महाग काळा तांदूळ, अभिषेक सुर्वे याचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 01:49 PM2020-10-10T13:49:56+5:302020-10-10T13:52:21+5:30

Agriculture Sector, konkan, rice, farmar, ratnagirinews, कोकणात भातशेती व्यावहारिकदृष्ट्या फायदेशीर नसल्याचा दावा केला असला तरी त्यात वेगवेगळे प्रयोग झाले तर शेतकरी आणि पर्यायाने कोकणाचा आर्थिक विकास होऊ शकतो, हे दापोलीच्या अभिषेक सुर्वे यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. जगात सर्वात महागड्या व शरीराला उपयुक्त असल्यामुळे औषध कंपन्यांकडूनही मागणी असलेल्या काळ्या तांदळाची शेती त्याने दापोलीत केली आहे.

Experiment with Abhishek Surve, the most expensive black rice in the world rooted in Konkan | कोकणात रुजलाय जगातील सर्वात महाग काळा तांदूळ, अभिषेक सुर्वे याचा प्रयोग

कोकणात रुजलाय जगातील सर्वात महाग काळा तांदूळ, अभिषेक सुर्वे याचा प्रयोग

googlenewsNext
ठळक मुद्देदापोलीतील करंजाळी येथे काळ्या तांदळाच्या शेतीचा प्रयोग यशस्वीकोकणाची अर्थव्यवस्था बदलण्याची क्षमता

दापोली : कोकणात भातशेती व्यावहारिकदृष्ट्या फायदेशीर नसल्याचा दावा केला असला तरी त्यात वेगवेगळे प्रयोग झाले तर शेतकरी आणि पर्यायाने कोकणाचा आर्थिक विकास होऊ शकतो, हे दापोलीच्या अभिषेक सुर्वे यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. जगात सर्वात महागड्या व शरीराला उपयुक्त असल्यामुळे औषध कंपन्यांकडूनही मागणी असलेल्या काळ्या तांदळाची शेती त्याने दापोलीत केली आहे.

दापोली तालुक्यातील करंजाळी येथील अभिषेक सुर्वे या सव्वीस वर्षांच्या तरूणाने हा आदर्श उभा केला आहे. अभिषेक हा दापोली तालुक्यातील करंजाळी येथील मूळ रहिवासी असला तरी तो मुंबई येथे अभियंता म्हणून नोकरीला होता. नोकरीचा राजीनामा देऊन तो आता दापोलीत आला आहे.

येथे अन्य काही करण्यापेक्षा त्याने शेतीला प्राधान्य दिले आणि वडिलोपार्जित शेतीत वेगवेगळे प्रयोग सुरू केले. तो मुंबईतील एका धान्य उत्पादन व वितरण व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सहभागी आहे. यामध्ये त्याला सर्वप्रथम काळ्या तांदळाची माहिती मिळाली.

लॉकडाऊन काळात पत्रव्यवहार करून त्याने काळ्या तांदळाचे बियाणे टपालाने मागवले. मात्र, लॉकडाऊन असल्यामुळे हे बियाणे मिळायला तीन महिन्यांचा अवधी लागला. यामुळे यातील अर्धेअधिक बियाणे खराब होऊन गेले. उरलेले बियाणे अभिषेकने जमिनीत पेरले. आज अभिषेकच्या दारात काळ्या तांदळाची भातशेती चांगली तरारली आहे.

या काळ्या तांदळाला मोठ्या शहरांबरोबर परदेशातही मोठी मागणी आहे. मोठ्या शहरांमध्ये हा काळा तांदूळ किमान चारशे ते पाचशे रुपये किलो दराने विकला जातो. फ्लिपकार्टसारख्या ऑनलाईन साईटवर या तांदळाची विक्री ३९९ रुपये दराने सुरू असल्याची माहिती यावेळी अभिषेक दिली.

काळा तांदूळ हा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहेच. शिवाय त्याला आरोग्याच्यादृष्टीनेही महत्त्व आहे. कार्बोहायड्रेटयुक्त असलेला हा काळा तांदूळ शरीरातील साखर व हृदयरोग असलेल्या रुग्णांना उपयुक्त आहे. काळ्या तांदळाच्या भातामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येते. त्यात मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने हे पचण्यास उपयुक्त असतात. सोबतच अँटी ऑक्सिडेंट तत्व असल्याने हे डोळ्यांसाठीही उपयुक्त ठरतात. स्वास्थ्यासाठी लाभदायक असल्याने औषध कंपन्यांकडूनही त्याला मोठी मागणी आहे.

१५० दिवसात तयार

देशात काळ्या तांदळाच्या वेगवेगळ्या चार ते पाच जातींचे उत्पादन केले जाते. १५० दिवसांमध्ये हा काळा तांदूळ तयार होतो. काळा तांदूळ हा असा एकमेव तांदूळ आहे त्यापासून बिस्किटे तयार केली जातात. शिवाय शरीर स्वस्त व मजबूत ठेवण्यासाठी याचा फायदा होतो, अशी माहिती अभिषेक सुर्वे यांनी दिली.

शेतकऱ्यांना फायदेशीर

कोकणामध्ये भातशेती ही तुकड्या - तुकड्यात विखुरली आहे. कोकणामध्ये भात शेतीसाठीच्या अल्प जागेमध्ये तेवढ्यातच श्रमामध्ये भात उत्पादक शेतकऱ्यांना दहा पट अधिक नफा देणारे हे बियाणे आहे. यामुळे कोकणातील शेतकऱ्यांनी आपल्या भात शेतीतील काही भागात पुढील वषार्पासून काळ्या तांदळाची शेती केल्यास ते कोकणाला वरदान ठरेल, असा विश्वास अभिषेक सुर्वे यांनी यावेळी व्यक्त केला.
 

Web Title: Experiment with Abhishek Surve, the most expensive black rice in the world rooted in Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.