पाेलीस अधिकाऱ्यांच्या तत्परतेने देता आली परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:28 IST2021-03-22T04:28:15+5:302021-03-22T04:28:15+5:30
रत्नागिरीचे उपविभागीय पाेलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी रविवारी रत्नागिरी शहरातील पटवर्धन हायस्कूल येथील परीक्षा केंद्राला भेट देऊन पाहणी केली. ...

पाेलीस अधिकाऱ्यांच्या तत्परतेने देता आली परीक्षा
रत्नागिरीचे उपविभागीय पाेलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी रविवारी रत्नागिरी शहरातील पटवर्धन हायस्कूल येथील परीक्षा केंद्राला भेट देऊन पाहणी केली. (छाया : तन्मय दाते)
लाेकमत न्यूज नेटवर्क
तन्मय दाते
रत्नागिरी : महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाची परीक्षा देण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. परीक्षेसाठी काेणत्याही केंद्रावर नंबर आला तरी तिथे जाऊन परीक्षा देण्याची तयारी विद्यार्थ्यांची असते. मात्र, ऐन परीक्षेच्या दिवशीच केंद्रावर येण्यास उशीर झाला, तर मात्र वर्षभर केलेली मेहनत वाया जाते. असाच काहीसा प्रकार आज रत्नागिरीतील एका केंद्रावर घडला, पण त्याच वेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले उपविभागीय पाेलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या तत्परतेने एका मुलाची परीक्षेला बसण्याची संधी वाया गेली नाही. परीक्षेला बसायला मिळाल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसत हाेते.
जिल्ह्यात रविवारी राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० घेण्यात आली. या परीक्षेसाठी रत्नागिरी तालुक्यात ३ केंद्रांची निर्मिती करण्यात आली हाेती. ही परीक्षा दाेन टप्प्यांत घेण्यात आली. परीक्षेसाठी सकाळी १० ते १२ या वेळेत होती. परीक्षेला वेळेच्या आधी अर्धा तास येणे बंधनकारक असते. या परीक्षा केंद्रांवर पाेहाेचण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ उडालेली असते. रविवारी तीनही परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरू असतानाच खेड येथून एक विद्यार्थी पटवर्धन हायस्कूल या केंद्रावर वेळेनंतर पाेहाेचला. त्यामुळे त्याला परीक्षा केंद्रात जाण्यास मज्जाव करण्यात आला. दूरवरून आलेल्या विद्यार्थ्याला परीक्षेला बसता येणार नाही, असे समजताच त्याचा चेहरा रडवलेला झाला. त्याचदरम्यान परीक्षा केंद्रांची पाहणी करण्यासाठी आलेल्या उपविभागीय पाेलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी त्या मुलाची विचारणा केली व त्या मुलाने त्यांना घडलेला प्रकार सगळा सांगितला. रेल्वे उशिराने आल्याने आपल्याला पाेहाेचण्यास उशीर झाल्याचे त्याने सांगितले.
सदाशिव वाघमारे यांनी केंद्र संचालकांना सर्व प्रकार सांगितला. त्यांनी या मुलाला परीक्षेला बसायला देण्याची विनंती केली. त्यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन केंद्र संचालकांनीही त्या मुलाला परीक्षेला बसण्याची परवानगी दिली. परीक्षेला बसायला मिळाले, म्हणून त्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. परीक्षेच्या लांबत गेलेल्या तारखांमुळे आधीच विद्यार्थी हैराण झाले आहेत. त्यातच परीक्षा केंद्रावर येऊन परीक्षेला बसण्याची संधी न मिळाल्यास पुन्हा मेहनत वाया जाणार, हे जाणून सदाशिव वाघमारे यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे त्या विद्यार्थ्याला परीक्षेला बसण्याची संधी हुकली नाही.