शेजाऱ्याकडून वीज घेतली, तरी दाखल होऊ शकतो चोरीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:35 IST2021-09-05T04:35:42+5:302021-09-05T04:35:42+5:30
मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : ज्या कारणासाठी वीज मीटर घेतला आहे, त्याऐवजी अन्य कारणासाठी विजेचा वापर करण्यात ...

शेजाऱ्याकडून वीज घेतली, तरी दाखल होऊ शकतो चोरीचा गुन्हा
मेहरून नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : ज्या कारणासाठी वीज मीटर घेतला आहे, त्याऐवजी अन्य कारणासाठी विजेचा वापर करण्यात आला, तर १२६ अन्वये वीजचोरीची कारवाई करण्यात येते. घर, शेती, बांधकाम, औद्योगिक, वाणिज्यिक प्रकारासाठी घेतलेली वीज जर अन्य दुसऱ्याच कारणासाठी वापरणे कायद्याने गुन्हा आहे. वर्षभरात जिल्ह्यात १४ लोकांवर कारवाई करण्यात आली असून, दीड लाखाचा दंड वसूल करण्यात आला आहे.
घरगुती, कृषी, औद्योगिक, वाणिज्यिक याशिवाय पथदीप, पाणीपुरवठा आदी विविध प्रकारच्या वीज जोडण्यांचे प्रकार असून, प्रत्येकाचे युनिट दर वेगवेगळे आहेत. मात्र, काही वेळा अनावधानाने तर काही वेळा जाणीवपूर्वक वेगळ्याच कारणासाठी जेव्हा वीज वापरण्यात येते, तेव्हा वापर करणारा ग्राहक गुन्ह्यास पात्र ठरतो. अशा प्रकारच्या ग्राहकांना हेरून कारवाई करण्यात येत आहे.
महावितरणकडून वर्षभरात झालेली कारवाई
कोरोनामुळे महावितरणकडून एकूणच कारवाईचे प्रमाण कमी आहे. वर्षभरात १४ ग्राहकांनी घेतलेल्या वीज मीटरचा अन्य कारणासाठी वापर केल्याचे निदर्शनास आल्यानंतर कारवाई करून दीड लाखाचा दंड वसूल करण्यात यश आले आहे.
१२६ अन्वये गुन्ह्यास पात्र
घरगुती, कृषी, वाणिज्यिक, औद्योगिक आदी विविध प्रकारच्या वीज जोडण्याचे युनिटनुसार दर वेगळे आहेत. बांधकामासाठीही विशेष जोडणी घेतली जाते, परंतु ज्या कारणास्तव वीज घेतली आहे, त्यासाठी न वापरता अन्य कारणासाठी घेतली, तर १२६ अन्वये ग्राहकावर कारवाई करण्यात येते.
चोरी कळवा, दंडातील १० टक्के रक्कम बक्षीस मिळवा
मीटरमध्ये छेडछाड करणे, आकडा टाकून वीजचोरी, मीटरची गती कमी करणे आदी प्रकार आढळल्यास, संबंधित ग्राहकावर १३५ अन्वये कारवाई करण्यात येते. ग्राहकाला तडजोडीची एक संधी देण्यात येते. त्यामध्ये दंडाची रक्कम भरून ग्राहकाला वीज जोडणीची एक संधी देण्यात येते.
जर ग्राहकांनी दंडाची रक्कम भरण्यास नकार दर्शविला, तर मात्र फाैजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो. या प्रकारच्या वीजचोरीची माहिती देणाऱ्याचे नाव गोपनिय ठेवण्यात येते. शिवाय दंडाची रक्कम जास्त असेल, तर दहा टक्के रक्कम बक्षीस म्हणून माहिती देणाऱ्यास देण्यात येते.
ग्राहक ज्या कारणासाठी वीज घेतो, त्या कारणाऐवजी अन्य कारणास्तव विजेचा वापर करतो, हे कायद्याने गुन्ह्यास पात्र ठरते. काही वेळा ग्राहकांकडून अनावधाने घडते, तर काही वेळा जाणीवपूर्वक केले जाते. गैरप्रकार आढळल्यानंतर कारवाई करावीच लागते. त्यामुळे गैरमार्गाचा अवलंब करण्याऐवजी ग्राहकांनी कारवाई टाळावी.
- देवेंद्र सायनेकर, अधीक्षक अभियंता.