एस्टीला थांबा तोट्याचा

By Admin | Updated: August 31, 2015 21:23 IST2015-08-31T21:23:37+5:302015-08-31T21:23:37+5:30

प्रवाशांकडे दुर्लक्ष : कर्मचारी-प्रशासनात ताळमेळाचा अभाव

EstiLa stop waiting | एस्टीला थांबा तोट्याचा

एस्टीला थांबा तोट्याचा

श्रीकांत चाळके - खेड  दिवसागणिक तोट्यात सुरू असलेली एस. टी. आता विविध समस्यांनी ग्रासली आहे़ एस. टी. नफ्यात आणण्यासाठी आता एस. टी. महामंडळाने नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत़ एका बाजूला एस. टी. चालकांच्या मनमानीमुळेच अनेक प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसत असतानाच चालकांच्या या बेशिस्त वर्तनाकडे डोळेझाक करीत एस. टी. प्रशासन नेमके काय साधणार आहे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. खेड तालुक्यातील बहुतेक मार्गावर धावणाऱ्या एस. टी. बसेस प्रशासनाने दिलेल्या थांब्यावर थांबवल्या जात नाहीत. काहीवेळा तर एस. टी. रिकामी असली तरीही प्रवाशांना न घेता निघून जाते़ दोन वर्षापूर्वी एस. टी.ने ‘हात दाखवा आणि थांबवा,’ अशी योजना अंमलात आणली होती. मात्र, अवघ्या काही महिन्यातच या योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. एस. टी.चे चालक गाडी रिकामी असली तरीही थांबवत नाहीत. विशेषत: अनेक शाळकरी मुलांच्या बाबतीतही हा अनुभव येतो. अनेकवयोवृध्द आजही एस. टी. प्रवासावर अवलंबून आहेत. शासनाने दिलेल्या एस. टी. सवलतीचा लाभ घेत हे वृध्द किंवा जेष्ठ नागरिक एस. टी.नेच प्रवास करीत असतात़ मात्र, या वृध्दांनाही चालक एस. टी. थांबवत नसल्याचा कटू अनुभव येत आहे. सर्वसामान्यांना परवडणारी आणि सर्वांचाच आधार असलेली एस. टी.ची सेवा आजच्या युगात आधारवड ठरली आहे. एस. टी.च्या पारंपरिक वेशभुषांकडे अनेक प्रवाशांनी दुर्लक्ष केल्याने महामंडळाने या बसेसच्या मदतीला काही आगारांमध्ये मिडीबसेस आणि काही नवीन सुविधायुक्त अशा बसेस आणल्या़ तरीही बससेवा तोट्यात चालली आहे. त्यामुळे आता महामंडळच याबाबत गंभीर बनले आहे.
गतवर्षी महामंडळाने याबाबत मास्टर प्लॅनही तयार केला़ यापूर्वीची ‘हात दाखवा व एस. टी. थांबवा’ याच योजनेची पुनरावृत्ती करण्याचा निर्णय घेत आणखी काही नव्या योजनांना जन्म दिला. मात्र, एस. टी. चालकांच्या वागण्याने या योजनांचेही तीनतेरा वाजले. एखादी बस रिकामी असल्यास चालक बस थांबवत नाहीत, असे प्रकार सातत्याने होत आहेत आणि एस. टी. तोट्यात जाण्याचे हेच प्रमुख कारण आहे.
प्रवाशाने हात केरुनही बस न थांबल्यास तेवढ्याच प्रवास खर्चात प्रवाशांना हवे तेथे थांबे घेत खासगी वाहनांनी ‘मायेचा बाजार’ मांडला आहे. अशावेळी एस. टी. चालकाची तक्रार करत न बसता प्रवासी ते विसरूनही जातो़ यामुळे एस. टी. चालक आपल्याबाबत कोणीही तक्रार करत नसल्याच्या गैरसमजातून वारंवार चुका करतो़ अशावेळी आगारप्रमुखांनी चालकांना तशा सक्तीच्या सुचना वारंवार देण्याची आवश्यकता असल्याचा सूर आता उमटू लागला आहे.
गेल्या तीन वर्षात खेड बस स्थानकातील उभ्या असलेल्या एस. टी. बसमध्ये अर्धा शेकडा चोऱ्यांच्या घटना घडल्या आहेत. पाकिटमार तसेच महिला प्रवाशांची पर्स चोरी आणि गळ्यातील मंगळसुत्रांच्या चोरीची घटना मोठ्या प्रमाणावर झाल्या आहेत. या चोऱ्यांच्या प्रकरणातील एकाही आरोपीला आजवर शिक्षा झाली नाही. त्यामुळे एस. टी. प्रवास सुरक्षित आहे, ही भावना आता धुळीला मिळत आहे.
महिला प्रवाशांना तसेच वयोवृध्दांनाही बसच्या प्रवासामध्ये सुरक्षितता वाटत नाही. मात्र, तरीही राज्य सरकारच्या बसमधून प्रवास केल्यास ते कमी खर्चाचे आणि सोयीचे असल्याने ते परवडणारे आहे. ही सर्वांचीच धारणा आहे़ अनेक एस. टी. चालकांच्या मनमानीपणामुळे प्रवाशांना जादा पैसे भरून खासगी वाहनांने प्रवास करावा लागत आहे. अशावेळी हेच एस. टी.चे प्रशासन वडापच्या नावावर खापर फोडत असते.
अनेकवेळा महामंडळ प्रशासनाच्या उदासीनतेमुळे एस. टी.च्या अशा चांगल्या योजनांचेही तीनतेरा वाजले आहेत.
प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांप्रती असलेल्या आस्थेविषयी देखील शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासन आणि कर्मचारी यांच्यात समन्वय निर्माण झाल्यास एस. टी.च्या बहुतांश योजना फलद्रूप झाल्याचे पहावयास मिळतील. याबरोबरच कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी आवश्यक तर सामंजस्यपूर्ण योजना तयार केल्यास आणि तिची नि:स्वार्थी अंमलबजावणी केल्यास एस. टी.चा तोटा काहीअंशी भरून निघण्यास मदत होणार आहे.

नफ्यात येण्यासाठी प्रयत्न
एस. टी. महामंडळ नेहमीच तोट्यात चालल्याची ओरड केली जाते. महामंडळाला नफ्यात आणण्यासाठी विविध योजना आखण्यात आल्या. पण त्याचा फायदा किती झाला, हे अजूनही कळलेले नाही. कर्मचारी आणि प्रशासन यांच्यातील ताळमेळाच्या अभावामुळे महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे. जास्तीचे काम पडले की, कर्मचाऱ्यांची ओरड असतेच. त्यामुळे योजना यशस्वी होताना दिसत नाहीत.

Web Title: EstiLa stop waiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.