एस्. टी. कामगार संघटनेचे आंदोलन
By Admin | Updated: October 15, 2016 23:22 IST2016-10-15T23:22:24+5:302016-10-15T23:22:24+5:30
रत्नागिरीत धरणे : शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगाची मागणी

एस्. टी. कामगार संघटनेचे आंदोलन
रत्नागिरी : शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन निश्चिती करून सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीबरोबरच अन्य प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र एस्. टी. कामगार संघटनेतर्फे माळनाका येथील विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बहुसंख्य एस्. टी. कर्मचारी सहभागी झाले होते.
यावेळी विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये विभागातील अनेक रात्रवस्तीच्या ठिकाणी चालक-वाहकांना प्रात:विधीसाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने त्यांना अडचणीचे ठरत आहे. भारत सरकारतर्फे ग्रामस्वच्छता कार्यक्रम राबविला जात आहे. मात्र, अनेक गावांमध्ये प्रात:विधीची सुविधा उपलब्ध नसल्याने रात्रवस्तीच्या कर्मचाऱ्यांना नाईलाजास्तव उघड्यावर हे विधी उरकावे लागतात. यामुळे विभागातील चालक-वाहकांमध्ये अपराधीपणाची भावना पसरली आहे. तसेच विभागातील सर्वच आगारांमध्ये बसेसना रिमोल्ड टायर बसविण्यात येत असल्याने गंभीर स्वरूपाच्या अपघाताची शक्यता आहे. व्हेईकल टूल्सच्या कमतरतेमुळे सर्वच आगारातील चालकांना त्रास सहन करावा लागत असून, नादुरुस्त क गाड्यांमुळे प्रवासी उत्पन्नही घटत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
यावेळी विभागीय अध्यक्ष राजू मयेकर, सचिव रवी लवेकर, खजिनदार संदीप भोंगले, कार्याध्यक्ष दत्ताराम घडशी तसेच नऊ आगारांमधील संघटनेचे अध्यक्ष, खजिनदार, सचिव, तसेच सदस्य बहुसंख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)