गेल्या वर्षापासून कोरोनाचा शिरकाव जिल्ह्यात झाला आहे. गेल्या मार्च महिन्यापासून सुमारे दहा महिने सर्व पर्यटन स्थळे बंद राहिली आहेत. त्यामुळे पर्यटन विकास महामंडळाची गणपतीपुळे, वेळणेश्वर येथील पर्यटन स्थळेही बंद होती. ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचे प्रमाण कमी होऊ लागले. त्यामुळे हिवाळी हंगामात पर्यटक येतील, असा विश्वास पर्यटन महामंडळाला वाटत असल्याने या काळात सर्व निवासस्थाने सॅनिटायझर करण्यात आली होती. त्याप्रमाणे जानेवारी महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच दहा महिने घरात अडकलेले पर्यटक जानेवारी - फेब्रुवारी महिन्यांत मोठ्या संख्येने बाहेर पडले. त्यामुळे या पर्यटनाने पर्यटन महामंडळाला दिलासा दिला होता. त्यामुळे पुन्हा उन्हाळी पर्यटनाला चांगले दिवस येणार, असे वाटू लागले होते. मात्र, यावर्षीही मार्च महिन्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे आता पुन्हा पर्यटनावर परिणाम होणार, अशी भीती वाटत आहे. मात्र, पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या वीकएंडलाच पूर्णपणे लाॅकडाऊन राहणार आहे. त्यामुळे याच काळाचा लाभ उठवत पर्यटकांना ही सुटी शासनाचे नियम पाळून सुरक्षित एन्जॉय करता यावी, यादृष्टीने महामंडळाने योग्य ती खबरदारी घेत गणपतीपुळे, वेळणेश्वर, तारकर्ली आदी ठिकाणची तंबू निवास व्यवस्था तसेच अन्य निवासस्थाने पर्यटकांना उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे सुटीच्या कालावधीत राहण्याबरोबरच महामंडळाच्या निसर्गरम्य परिसरात फिरण्याचा आनंद घेता येणार आहे. मात्र, यासाठी शासनाच्या कोरोनाच्या अनुषंगाने असलेल्या नियमांचे पालन महामंडळाकडून करण्यात येणार असून बाहेरून येणाऱ्या पर्यटकांनाही त्याचे काटेकाेरपणे पालन करावे लागणार आहे. मात्र, वर्षभर घरात बसून कंटाळलेल्या पर्यटकांना निवांतपणे सुटीचा आनंद अन्य पर्यटनस्थळी जाऊन घेता आला नाही, तर महामंडळाच्या परिसरात निसर्गाच्या सानिध्यात मिळणार आहे.
चौकट
पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दररोज दोनदा थर्मल गन व ऑक्सिमीटरच्या साहाय्याने स्क्रीनिंग होणार. तसेच सर्व कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी होणार आहे. हात वेळेवर सॅनिटाइज करण्याच्या सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत. ४५ वर्षांवरील कर्मचाऱ्यांचे लसीकरण अथवा आरटीपीसीआर चाचणी करणे सक्तीचे असेल. मास्क वापरणेही सक्तीचे असेल.
चौकट
बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी शासनाच्या नियमानुसार लसीकरण तसेच आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असेल. मास्क, सॅनिटायझर याबरोबरच पाच व्यक्ती एकत्र येणार नाहीत, ही काळजी घेतली जाणार आहे. पर्यटन महामंडळाच्या सर्व खोल्या निर्जंतुक करण्यात आल्या आहेत.
चौकट
शासनाने ३० एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन वाढविले आहे. वीकएंडला कडक लाॅकडाऊन करण्यात येणार आहे. या काळात बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना कोरोना चाचणी किंवा लसीकरण करून जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार आहे. ही बाब पर्यटन महामंडळासाठी जमेची ठरणार आहे. ही सुटी पर्यटन महामंडळाच्या परिसरात पर्यटकांनी घालवावी, या उद्देशाने महामंडळाकडून याजागी पर्यटकांना विविध मनोरंजनाचे खेळही उपलब्ध करून दिले जाणार आहेत. निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंद मिळणार आहे.
कोटसाठी
गेल्यावर्षी उन्हाळी हंगाम तोट्यात गेला असला तरी यावर्षी जानेवारी - फेब्रुवारी महिन्यांत पर्यटनाचा हंगाम नसतानाही पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडले. आता कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. या आपत्तीचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी सकारात्मक राहून शासनाच्या नियमांचे पालन करून पर्यटनाचा आनंद मिळवून देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा प्रयत्न आहे.
दीपक माने, विभागीय पर्यटन अधिकारी, कोकण विभाग, एम.टी.डी.सी.