स्वत:च्या पंखांवरील ‘विश्वासा’ची गरूडझेप

By Admin | Updated: September 15, 2015 00:02 IST2015-09-15T00:01:19+5:302015-09-15T00:02:25+5:30

रत्नागिरीतील विश्वास अनिल शिंदे या तरूणानं हीच गोष्ट

The empire of faith on its wings | स्वत:च्या पंखांवरील ‘विश्वासा’ची गरूडझेप

स्वत:च्या पंखांवरील ‘विश्वासा’ची गरूडझेप

मनोज मुळ्ये; रत्नागिरी : डळमळीत फांदीवरही पक्षी आरामात बसतात... त्यांचा फांदीवर विश्वास असतो म्हणून नाही... तर त्यांचा विश्वास असतो आपल्या पंखांवर..! पंखांवर विश्वास असला की, भरारी घेण्यासाठी आकाशही अपुरं पडतं. रत्नागिरीतील विश्वास अनिल शिंदे या तरूणानं हीच गोष्ट सिद्ध केलीय. नववीत असताना गालगुंड होऊन दोन्ही कानांचं काम पूर्ण थांबलं, पण विश्वासची जिद्द थांबली नाही. दोन्ही कानांनी ऐकू येत नसतानाही विश्वास चिकाटीनं दहावी झाला, पुढे अभियांत्रिकीची पदविका घेतली आणि तो पदवी परीक्षेचाही अभ्यास करतोय. पंखांवरचा विश्वास म्हणतात तो हाच असावा...
रत्नागिरीतील फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणारा विश्वास मूळचा रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई गावचा. फाटक हायस्कूलमध्ये शिकणारा. वडील छोटी-मोठी कामं करायचे. आई अस्मिता चार घरची धुणी-भांडी करते. २0१0 साली तो नववीत असताना त्याला गालगुंड झालं. त्यामुळे दोन्ही कानांनी त्याला कमी-कमी ऐकू येऊ लागलं. ज्यांच्याकडे उपचार सुरू होते, त्यांनी धीर दिला की, गालगुंड बरं झालं की नीट ऐकू येईल. पण, दुर्दैव आड आलं आणि गालगुंड बरं होईपर्यंत विश्वासच्या दोन्ही कानांनी दगा दिला होता. अनेक डॉक्टर्सना दाखवूनही विश्वासचे कान सुधारले नाहीत. तो गडबडून गेला. काय करायचं हे न समजल्यानं त्यानं शाळेत जाणंच सोडलं. पण, त्याची हुशारी शिक्षकांना चांगली माहिती होती. प्रतिभा प्रभुदेसाई या त्याच्या शिक्षिका त्याच्या घरी गेल्या. दोन्ही कानांनी ऐकू येत नसल्यानं तो शाळेत येत नाही, हे समजलं तेव्हा त्यांनी त्याला आणि त्याच्या घरच्यांना समजावलं. त्यांच्या प्रयत्नांमुळे विश्वास पुन्हा शाळेत जायला लागला. प्रभुदेसाईबाई, आठल्येबाई, शेट्येबाई यांच्यासह सर्वच शिक्षकांनी खूप प्रोत्साहन दिल्याचं तो आवर्जून सांगतो. हे गुरूऋण त्याच्या बोलण्यातून नकळत जाणवतं. दोन-तीन नावं घेतानाच ‘कित्ती शिक्षकांची नावं सांगू? सगळ्यांनीच खूप धीर दिला, प्रोत्साहन दिलं,’ असं तो आवर्जून सांगतो.
काहीही ऐकू येत नव्हतं. फक्त वाचायचं आणि आकलन करून घ्यायचं, असं करत विश्वासने दहावीला ८0 टक्के गुण मिळवले. आजच्या काळात ८0 टक्के फार वाटत नाहीत. पण विश्वास ज्या पद्धतीने शिकला, त्या पद्धतीने ते नक्कीच खूप मोठे आहेत. शाळेने अपंग म्हणून त्याचा फॉर्म भरला होता. अपंगांमध्ये तो कोल्हापूर बोर्डात दुसरा आला होता. त्याचे दुर्दैवाचे फेरे संपले नव्हते. २0११ साली तो दहावी झाला आणि त्याच वर्षी त्याचे बाबा त्याला सोडून गेले. विश्वासनं शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथेही काही ऐकता येत नसतानाही फक्त वाचून त्याने ८0 टक्के मिळवून पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. दरम्यान, त्याच्या कानाला श्रवणयंत्र लावण्याचाही प्रयत्न झाला. पण त्यानेही काही फरक पडला नाही. त्याला ऐकू येतच नव्हते. याचकाळात सत्य साई ट्रस्टचे रत्नागिरीतील प्रतिनिधी कमलाकर पटवर्धन यांनी विश्वासची धडपड आणि त्याची हुशारी पाहिली. त्यांनी पुढाकार घेत शस्त्रक्रियेसाठी विश्वासला प्रोत्साहित केले. सहा लाख रूपये खर्चाच्या आॅपरेशनसाठी विश्वासला २ लाख रूपये जमवायचे होते. मित्रांच्या, ओळखीच्या लोकांच्या मदतीने तेही जमले. पण ते खर्च करायची वेळच आली नाही. पैसे न भरताच त्याचं आॅपरेशन झालं. त्याच्या कानाला यंत्र बसवण्यात आले आहे. पण अजूनही त्याला नीट ऐकू येत नाही.
पदविका परीक्षेतील यशामुळे त्याने रत्नागिरीतीलच फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतलाय. तिथे त्याचं दुसरं वर्ष सुरू आहे. कानाची समस्या तीव्र असली तरी त्याला अजून शिकायचंय. सर्वसाधारण वर्गात प्रवेश घ्यावा लागत असल्याने त्याला फीची समस्या आहे. आॅपरेशनसाठी जमवलेले आणि न लागलेले पैसे तो थोडेथोडे पुढच्या शिक्षणासाठी वापरतोय. समस्या खूप आहेत. पण आपल्या पंखात ताकद आहे, याची जाणीव आहे. म्हणूनच त्याच्या भरारीला आकाशही पुरेसं पडणार नाही.
मित्राची मदत विसरू शकत नाही
पदविका अभ्यासक्रम शिकताना आपल्याला प्रथमेश राजेशिर्के नावाचा मित्र भेटला. त्याने आपल्याला शिक्षणात खूप मदत केलीच, पण माझ्या आॅपरेशनसाठी पैसे जमवायलाही तो खूप धडपडला. त्याच्यामुळेच पदविका पूर्ण करणं आपल्याला सोपं गेलं, असं विश्वास मनापासून सांगतो. आता प्रथमेश पदवीसाठी सांगलीला गेलाय, म्हणून आपल्याला अडचणी येतात, हेही तो प्रांजळपणे सांगतो.
गाड्यांचे आवाज थोडे थोडे जाणवतात..
आॅपरेशननंतर कानाच्या यंत्रामुळे विश्वासला थोडंफार ऐकू येतंय. त्या आधारावर रस्त्याने जाताना पाठीमागून येणाऱ्या गाड्यांचे आवाज त्याला ऐकू येतात. त्यामुळे तो कोणीही बरोबर नसताना सर्वत्र चालत फिरतो.
‘प्रभू’देसार्इंच्या रूपात
रत्नागिरीतील डॉ. शरद प्रभूदेसाई यांनी खूप मदत केली. विश्वास सध्या त्यांच्याचकडे राहतो. त्यांच्यासारख्या माणसांमुळेच आपल्याला पुढे जाता येतंय, याची जाणीव त्याला आहे.
विश्वास ओठ वाचतो...
अजिबातच ऐकू येत नाही, हे कळल्यानंतर आपोआपच विश्वासला बोलणाऱ्याचे ओठ वाचायची सवय लागली. पण इंग्रजी भाषेत आणि जलद बोलणाऱ्यांचे बोलणे तो वाचू शकत नाही.


 

Web Title: The empire of faith on its wings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.