रत्नागिरी जिल्ह्यात सरपंच निवडणुकीत शिवसेनेचीच सरशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 17:44 IST2017-10-17T17:40:08+5:302017-10-17T17:44:46+5:30
रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेने आपले वर्चस्व कायम ठेवले असून, २१५ पैकी तब्बल ११५ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच निवडून आले आहेत. त्याखालोखाल गाव पॅनेलने बाजी मारली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात सरपंच निवडणुकीत शिवसेनेचीच सरशी
रत्नागिरी , दि. १७ : जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेने आपले वर्चस्व कायम ठेवले असून, २१५ पैकी तब्बल ११५ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच निवडून आले आहेत. त्याखालोखाल गाव पॅनेलने बाजी मारली आहे. गावपॅनेलचे ५९, राष्ट्रवादी काँग्रेसचे २३ तर भाजपचे १० सरपंच निवडून आले आहेत. काँग्रेस सर्वात शेवटच्या क्रमांकावर असून, त्यांचे केवळ ४ सरपंच विजयी झाले आहेत.
जिल्ह्यात गेली अनेक वर्षे शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थांवरील आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. पाचपैकी तीन विधानसभा मतदार संघ, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि गावपातळीवरही शिवसेनेचे प्राबल्य आहे. या निवडणुकीतही शिवसेनेचा हा करिश्मा कायम राहिला. यावेळी सरपंच पदासाठी थेट निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
जिल्ह्यातील २१५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये तब्बल ११५ ठिकाणी शिवसेनेचे सरपंच निवडून आले आहेत. त्यात रत्नागिरी, राजापूर, लांजा आणि दापोली या चार तालुक्यांमध्ये शिवसेना सरपंचांची संख्या अधिक आहे.
चिपळूण तालुक्यात मात्र ३२ ग्रामपंचायतींपैकी तब्बल २० ठिकाणी गाव पॅनेलचा उमेदवार सरपंच झाला आहे. या निवडणुकीत एकूण ५९ ठिकाणी गावपॅनेलचे सरपंच निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला २३ ठिकाणीच यश मिळाले आहे. त्यात दापोली आणि चिपळूणमध्ये राष्ट्रवादीला थोडेफार यश आहे.
राज्यात सत्तेत असलेल्या भाजपकडून नगर परिषद निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही काहीतरी चमत्कार घडण्याची अपेक्षा केली जात होती. मात्र २१५पैकी केवळ १० ठिकाणी भाजपचे सरपंच निवडून आले आहेत.
काँग्रेसची अवस्था सर्वात दारूण झाली असून, फक्त चार सरपंचपदांवरच काँग्रेसला समाधान मानावे लागले आहे. संगमेश्वर तालुक्यात बहुजन विकास आघाडीने एक सरपंच पद मिळवले आहे.