कॉंग्रेस तालुकाध्यक्षपदाची निवड अखेर रद्द; मुंबईतील बैठकीत प्रदेशाध्यक्षांनी घेतला निर्णय

By संदीप बांद्रे | Published: February 2, 2024 09:08 PM2024-02-02T21:08:02+5:302024-02-02T21:08:16+5:30

दोन दिवसांपूर्वी काँग्रेस तालुकाध्यक्षपदी सुधीर दाभोळकर यांची निवड जाहीर केली होती. मात्र या निवडीवरून काँगेसमध्ये पक्षांतर्गत वाद निर्माण झाला.

Election of Congress taluk president finally cancelled; The state president took the decision in a meeting in Mumbai | कॉंग्रेस तालुकाध्यक्षपदाची निवड अखेर रद्द; मुंबईतील बैठकीत प्रदेशाध्यक्षांनी घेतला निर्णय

कॉंग्रेस तालुकाध्यक्षपदाची निवड अखेर रद्द; मुंबईतील बैठकीत प्रदेशाध्यक्षांनी घेतला निर्णय

चिपळूण : दोन दिवसांपूर्वी काँग्रेस तालुकाध्यक्षपदी सुधीर दाभोळकर यांची निवड जाहीर केली होती. मात्र या निवडीवरून काँगेसमध्ये पक्षांतर्गत वाद निर्माण झाला. तालुकाध्यक्ष पदाची निवड परस्पर व पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता केली असल्याचा आक्षेप घेत याविषयी थेट प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्याकडे दाद मागण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबई दादर टिळक भवन येथे झालेल्या बैठकीत त्यांनी या निवडीला स्थगिती दिली. तसेच चार दिवसांत तालुकाध्यक्ष पदाची पुन्हा निवड करण्याचे ठरले. 

प्रशांत यादव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या तालुकाध्यक्ष पदावर अचानक सुधीर दाभोळकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्यामार्फंत ही निवड झाली होती. मात्र त्यांच्या या निवडीला पक्षांतर्गत विरोध जोरदारपणे झाला. एवढेच नव्हे तर काहींनी पक्षाचा राजीनामा देण्याचा पवित्रा स्विकारला. त्यांची ही निवड पक्षातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर करण्यात आली. तसेच पक्ष निरीक्षकांचा अहवाल सादर न होताच ही निवड जाहीर करण्यात आली. अशा पध्दतीचे विविध आक्षेप घेत त्यांच्या या निवडीला स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध दर्शवला. काँग्रेस शहराध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह, महिला काँग्रेस शहराध्यक्ष श्रद्धा कदम व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांच्यासह काँग्रेस महिला आघाडी व सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी या निवडीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. अखेर याबाबत पक्षीय स्तरावर दखल घेत शुक्रवारी तातडीने मुंबईत बैठक घेण्यात आली.

मुंबईतील या बैठकीला चिपळुणातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत सुधीर दाभोळकर यांच्या निवडीला विरोध केला. तसेच या परस्पर घेतलेल्या निर्णयाबाबतही नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  पटोले यांनी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत या तालुकाध्यक्षपदाच्या निवडीला स्थगिती दिली.तसेच याबाबत चार दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे घोषित केले. प्रदेशाध्यक्षांच्या या निर्णयाचा काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच नव्या तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Election of Congress taluk president finally cancelled; The state president took the decision in a meeting in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.