रत्नागिरी : कोळसावाहू ट्रेलरने तब्बल आठ गाड्यांचा चुराडा केल्याचा भीषण अपघातात बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे झाला. यात आयटीआयमधील १९ वर्षीय विद्यार्थी जागीच ठार झाला आहे. चार कार, तीन दुचाकी आणि एका रिक्षाला ठोकरून हा ट्रेलर संरक्षक कठड्यावर जाऊन आदळला. ट्रेलरचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला. शिवम रवींद्र गोताड (झरेवाडी, ता. रत्नागिरी), असे ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. यात काही गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला असला तरी अनेक जण सुदैवाने बचावले आहेत.नोकरी आटोपून घरी जाणारे कर्मचारी, शाळा-महाविद्यालय संपल्यानंतर घरी जाणारे विद्यार्थी यामुळे सायंकाळच्या वेळी हा मार्ग गजबजलेला असतो. अशावेळी निवळीकडून गोव्याकडे जाणारा १६ चाकी ट्रेलर (केए २९ सी १८४३) ब्रेक फेल झाल्यामुळे काळ बनून आला. हातखंबा गावापूर्वी असलेल्या तीव्र वळणावर या ट्रेलरचे ब्रेक निकामी झाले. महामार्ग रुंदीकरणाच्या कामामुळे जेथे रस्ता अरुंद आहे, तेथे वाहने एका रांगेत चालली होती.ब्रेक निकामी झालेल्या या ट्रेलरने आपल्या पुढे जाणाऱ्या वाहनांना धडक दिली. त्या गाड्या पुढे एकमेकांवर आपटल्या. त्याचा फटका चार कार, तीन दुचाकी आणि एका रिक्षाला बसला. जवळपास २०० मीटर ट्रेलरने आपल्यासोबत बाकी गाड्या फरफटत नेल्या. आयटीआयमध्ये शिकणारा शिवम गोताड दुचाकीवरून आपल्या घरी जात होता. त्याची दुचाकी ट्रेलरच्या चाकाखाली आली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.या अपघातात डॉ. महेश महाले यांची क्रेटा कार, मंगेश नागले यांची रिक्षा, कृष्णदेव भरत येडगे यांची स्प्लेंडर, अविनाश विजय ठाकरे (रा. लांजा) यांची मोटारसायकल, तर लांजा येथील ॲड. समीर दळवी, डॉ. सुदेशकुमार शिवाजीराव चव्हाण यांची कार, संग्राम विलास साळवी (रा. नाचणे, रत्नागिरी) यांची कार, तर सत्यविनायक सुरेश देसाई यांच्या कारला ट्रेलरने धडक दिली.या भीषण अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर, पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव, उपनिरीक्षक धुमसकर यांच्यासह हातखंबा वाहतूक मदत केंद्राच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवम गोताड याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला. अन्य वाहन चालक, प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
आतापर्यंत ४ बळीहातखंबा येथे गेल्या काही महिन्यांत त्याच जागी अनेक अपघात झाले आहेत. तीव्र उतार आणि महामार्ग रुंदीकरणाचे काम यामुळे या भागात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. पुलाचे काम बराच काळ रखडले आहे. ते काम झाले तर अपघातांची संख्या कमी होईल. गेल्या काही महिन्यांत याच भागात अपघातात चार जणांचा बळी गेला आहे.
एअर बॅग उघडली अन् ते वाचलेरत्नागिरीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयवंत करपे हे शासकीय काम आटोपून राजापूर येथे कामानिमित्त जात होते. अचानक त्यांच्या कारवर ट्रकने धडक दिल्यानंतर त्यांची गाडी समोरील गाडीवर आदळली. यामध्ये त्यांच्या पूर्ण कारचा चुराडा झाला. मात्र, क्षणार्धात एअर बॅग उघडल्यामुळे करपे बालंबाल बचावले.