शिक्षण ऑनलाइन, शिक्षक मात्र शाळेत, परिसर चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:34 IST2021-09-18T04:34:16+5:302021-09-18T04:34:16+5:30
मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यातील प्राथमिक व खासगी तसेच माध्यमिक शाळांचे ऑनलाइन अध्यापन सुरू आहे. ...

शिक्षण ऑनलाइन, शिक्षक मात्र शाळेत, परिसर चकाचक
मेहरून नाकाडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यातील प्राथमिक व खासगी तसेच माध्यमिक शाळांचे ऑनलाइन अध्यापन सुरू आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावातील ६० शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या असून, आठवी ते दहावीपर्यंतचे अध्यापन सुरू आहे. उर्वरित ३१४१ शाळांचे ऑनलाइन अध्यापन सुरू असल्याने विद्यार्थी घरात व शिक्षक मात्र शाळेत येत आहेत. शिक्षक शाळेत येऊनच अध्यापन करीत असल्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थांच्या सहकार्यातून शालेय इमारत व परिसराची स्वच्च्छता राखण्यात येत आहे. त्यामुळे शासन आदेशानुसार शाळा सुरू झाल्या तरी इमारत व परिसर विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आहेत.
शहरातील शाळाच नव्हे तर ग्रामीण भागातील, वाडी-वस्तीवरील, दुर्गम भागातील शाळांची स्वच्छता व सुरक्षेबाबत विशेष काळजी घेण्यात येत आहे. ज्या भागात मोबाइल रेंजचा प्रश्न आहे, त्या भागातील शिक्षक पालकांच्या व ग्रामस्थांच्या संमत्तीने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्यापन करीत आहेत. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शिक्षक विशेष परिश्रम घेत आहेत.
शाळा व परिसराची स्वच्च्छता
- शाळेत विद्यार्थी अध्यापनासाठी येत नसले तरी शिक्षक मात्र शाळेत प्रत्यक्ष उपस्थित राहत आहेत. त्यामुळे पालक, ग्रामस्थ व शिक्षक पालक संघाच्या सहकार्यामुळे शालेय इमारत व परिसराची साफसफाई वेळोवेळी करण्यात येत आहे.
पालकांचे लाभते सहकार्य
- ऑनलाइन अध्यापनामुळे विद्यार्थी घरी आहेत. त्यामुळे मुलांकडून गृहपाठ तसेच प्रकल्प तयार करून घेत असताना, पालकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सूचना करण्यात येत असून, त्यासाठी पालकांचे सहकार्य सातत्याने लाभत आहे.
शिक्षकांची उपस्थिती शंभर टक्के
- जिल्हा परिषदेच्या २२१२ शाळांचे अध्यापन ऑनलाइन सुरू असून, ३६२ शाळांमध्ये ऑनलाइन अध्यापन सुरू आहे. गणेशोत्सवाची सुट्टी संपवून गुरुवारपासून शाळांचे अध्यापन सुरू झाले आहे. शासनाच्या आदेशानुसार शिक्षक शाळेत उपस्थित राहून अध्यापन करीत आहेत. शिक्षक उपस्थिती १०० टक्के आहे.
शासन आदेशानुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करणे शक्य नसल्याने ऑनलाइन अध्यापन सुरू आहे. त्यामुळे शिक्षक शाळेत जावूनच ऑनलाइन अध्यापन करीत आहेत. मोबाइल नेटवर्क समस्या असलेल्या भागात मात्र ऑफलाइन शिक्षण सुरू आहे. शिक्षकांची उपस्थिती शंभर टक्के असून, शाळा, परिसर स्वच्छ ठेवण्यात आला आहे.
- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी
तालुकानिहाय शाळा व शिक्षक
मंडणगड १५४ ३७१
दापोली २७८ ६९२
खेड ३४७ ८४०
चिपळूण ३५१ ९३२
गुहागर २०१ ५३०
संगमेश्वर ३६४ ९५०
रत्नागिरी ३१७ ८२६
लांजा २१७ ५६४
राजापूर ३४५ ८१३
- २५७४ प्राथमिक शाळा
- २२१२ शाळांमध्ये ऑनलाइन अध्यापन
- ३६२ शाळा मात्र ऑफलाइन