आभाळाएवढ्या जिद्दीला बेरोजगारीचे ग्रहण
By Admin | Updated: August 22, 2014 00:50 IST2014-08-21T20:33:49+5:302014-08-22T00:50:46+5:30
जन्मापासून अपंग : आई-वडिलांचा आधार बनला, पण...

आभाळाएवढ्या जिद्दीला बेरोजगारीचे ग्रहण
खेड : शाळेत असताना तो पहिल्या बाकावरच्या मुलांइतकाच चुणचुणीत होता़ नकलांच्या श्रवणाने टाळ्या घ्यायचा, तर धावण्याच्या मैदानावर संघाचे नेतृत्वही करायचा. जन्मत:च आलेल्या अपंगत्त्वावर त्याने जिद्दीने मात केली़ पारंपरिक भातशेतीत राबत आई-वडिलांना हात देणारा हा तरूण त्यांचा आधार बनू पाहत आहे. पण त्यात बेरोजगारीचा मोठा अडसर आहे.
महेश चाळके हे त्याचे नाव! अपंगांच्या राज्यस्तरीय अॅथलेटिक्स इव्हेंटमध्ये आतापर्यंत त्याने तीन सुवर्णपदक प्राप्त केली आहेत़ विविध क्षेत्रात आपल्या अपंगत्त्वावर मात करीत महेशने दाखवलेल्या धाडसाचे अनेकवेळा कौतुकही झाले़ मात्र, ४० टक्के अपंगत्व असूनही शासनाकडून त्याला अद्याप कमावते हात काही लाभू शकले नाहीत.
४० टक्के अपंगत्व असल्याने त्याला जोरात पळताही येत नाही की, अवजड कामेही करता येत नाहीत. हलकी आणि सहज होणारी कामे अगदी बाक येईपर्यंत तो वाकून करतो.़ घरची आर्थिक परिस्थितीही अत्यंत बेताची. एवढंच नव्हे पालकांनाही आजारांनी सदोदीत घेरलेलं असून, संकटामागून संकटे येत आहेत.
जगण्यासाठी कुटुंबाची तुटपंजी भातशेती आहे. भातशेती करण्यासाठी आवश्यक असणारे बैल, गोठा आणि चारा यांची नेहमीच वानवा. परिस्थितीवर मात करण्यासाठी त्याच्याजवळ नोकरीशिवाय पर्याय नाही़ म्हणूनच जिद्दीने तो विविध वाहनांवर ‘ड्रायव्हिंग’ शिकला.
जोडलेला मित्र परिवार आणि आपुलकीच्या जोरावर जमेल त्या आणि मिळेल त्यावेळी त्याने वाहनांवर बसून वाहन चालवण्याचे कसब आत्मसात केले़ सन २०१० आणि २०१२मध्ये नागपूर आणि बेंगलोर येथे पार पडलेलल्या अपंगांच्या राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत त्याने चमकदारी कामगिरी केली आहे़
१०० मीटर आणि २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत त्याने नेत्रदीपक कामगिरी करून दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. लांब उडीमध्येही त्याने सुवर्णपदक मिळवून आपली जिद्द जगाला दाखवून दिली आहे. खेळामध्ये मिळवलेले यश आणि ड्रायव्हिंग परवान्यामुळे लोटे येथील औद्यौगिक वसाहतीमधील काही कंपन्यांमध्ये त्याने चालक पदासाठी नोकरीही शोधली़ मात्र, प्रत्येकवेळी त्याला आपल्या उंचीचा अडसर जाणवत होता. पाठीला बाक असल्याने त्यात त्याने आपली उंचीही गमावली. याचा परिणाम त्याला आपल्या प्रत्येक कामात भोगावा लागत आहे़
जन्मत:च अपंगत्व आल्यानंतरही त्याने कधीही मागे पाहिले नाही. आई-वडिलांना घरच्या कामात मदत करीत त्याने आपली जिद्द वेळोवेळी दाखवून दिली. भावाने कर्ज काढून घेऊन दिलेला ट्रॅक्टरही वर्षभराच्या आत चोरीला गेला आहे़
संकटामागून संकटे येत असताना महेशने आजही नोकरीची जिद्द सोडली नाही. त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. आर्थिक परिस्थितीमुळे पुढचे शिक्षण घेणे त्याला शक्य झाले नाही. अनेक आर्थिक अडचणी उद्भवल्या़ गेली १० वर्षे तो नोकरी मिळवण्यासाठी झगडतोय. सध्या आई-वडिलांच्या मोलमजुरीवरील तुटपंज्या उत्पन्नावर त्याची एका दिवसाची चूल पेटत आहे. तरीही अपंगत्त्वावर मात करत नोकरी मिळवण्याची धडपड सुरूच आहे... स्वत:च्या हिमतीवर उभं राहण्याची जिद्द कायम ठेवून.. (प्रतिनिधी)