कोरोनातही दसरा झाला हसरा, अर्थकारणाचे सीमोल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 15:39 IST2020-10-28T15:37:56+5:302020-10-28T15:39:35+5:30
CoronaVirus, Dasara, Ratnagirinews यावर्षी कोरोनाचे संकट आले असले तरी ऑगस्ट महिन्यात लॉकडाऊनमध्ये काहीअंशी शिथीलता आल्याने लोकांच्या हातात पैसा आला. त्यामुळे यावेळी दसऱ्याच्या मुहूर्तावर घरे, सोने, वाहने त्याचप्रमाणे इतर वस्तूंची खरेदी चांगली झाली. परिणामी यावर्षीचा दसरा हसरा झाला. बाजारपेठेत यावेळीही करोडोंची उलाढाल झाली.

कोरोनातही दसरा झाला हसरा, अर्थकारणाचे सीमोल्लंघन
शोभना कांबळे
रत्नागिरी : यावर्षी कोरोनाचे संकट आले असले तरी ऑगस्ट महिन्यात लॉकडाऊनमध्ये काहीअंशी शिथीलता आल्याने लोकांच्या हातात पैसा आला. त्यामुळे यावेळी दसऱ्याच्या मुहूर्तावर घरे, सोने, वाहने त्याचप्रमाणे इतर वस्तूंची खरेदी चांगली झाली. परिणामी यावर्षीचा दसरा हसरा झाला. बाजारपेठेत यावेळीही करोडोंची उलाढाल झाली.
ऑगस्ट महिन्यात लॉकडाऊनमध्ये शिथीलता आल्याने उद्योग - व्यवसाय बऱ्यापैकी सुरू झाले. त्यामुळे लोकांच्या हातात पैसे आले. एवढे महिने थंड असलेली बाजारपेठ गजबजू लागली. दसरा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक महत्वाचा मुहुर्त मानला जातो. त्यामुळे यावर्षी दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर घरे, सोन्याचे दागिने, वाहन खरेदीसाठी लोक घराबाहेर पडले.
गतवर्षाइतकी यावर्षी खरेदी झाली नसली तरी विक्रेत्यांच्या अपेक्षेपेक्षा चांगली झाली असल्याच्या प्रतिक्रिया व्यापारी व्यक्त करत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील मंदीवर थोडा तरी दिलासा मिळाला आहे.
सराफ बाजारात २५ ते ३० कोटी रुपयांची उलाढाल
सोने आणि चांदीचे दर लॉकडाऊन काळात वाढलेले असले तरी दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर लोक खरेदीसाठी बाहेर पडले. सध्या सोन्याचा दर प्रति १० मिलीग्रॅमला ५१ हजार ५०० रूपये इतका तर चांदीचा दर प्रतितोळा ६५ हजार रुपयांपर्यंत गेला आहे. सध्या उद्योगधंदे, व्यवसाय बऱ्यापैकी सुरू झाल्याने सोन्याच्या खरेदीलाही चांगला प्रतिसाद मिळाला. दसऱ्यादिनी सराफ बाजारात २५ ते ३० कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याचे रत्नागिरी जिल्हा सराफ असोसिएशनचे सचिव प्रमोद खेडेकर यांनी सांगितले.
१२ ते १५ कोटींची उलाढाल
गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी तसा प्रतिसाद कमी मिळाला. मात्र, दसऱ्यासाठी लोकांनी या वस्तूंच्या खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी या व्यापाऱ्यांची विक्री चांगली झाली. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता जवळपास ८० ते ९० दुकाने इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आहेत. दसऱ्याच्या दिवशी या दुकानांमधून चांगली विक्री झाली. जिल्ह्यात सुमारे १२ ते १५ कोटींची उलाढाल झाली असल्याचे रत्नागिरीतील इलेक्ट्रॉनिक व्यावसायिक संघटनेचे पदाधिकारी रवींद्र घोसाळकर यांनी सांगितले.
मुद्रांक शुल्कात कपात
कोरोनाच्या अनुषंगाने सरकारने मुद्रांक शुल्कात कपात केली आहे. तसेच जीएसटीच्या करातही सूट दिली आहे. बँकांनीही गृह कर्जाच्या व्याजात कपात केल्याने दिल्याने यावर्षी गृह खरेदीला चांगलाच प्रतिसाद मिळाला. दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यात तब्बल १६८ घरांची नोंदणी झाली. त्यातून ५३ लाख ९५ हजार ९५० रुपये इतके मुद्रांक शुल्क तर नोंदणी शुल्कातून १२ लाख ३ हजार ६६० एवढा महसूल प्रशासनाला मिळाला.