चिपळुणात रॉकेलची टंचाई

By Admin | Updated: September 8, 2015 22:29 IST2015-09-08T22:29:26+5:302015-09-08T22:29:26+5:30

गराहकांना फटका : पुरवठा शाखेचा स्वत:च्या निर्णयालाच हरताळ

Due to the lack of kerosene in Chiplun | चिपळुणात रॉकेलची टंचाई

चिपळुणात रॉकेलची टंचाई

चिपळूण : शासनाने रॉकेलचे रेशनिंग केल्यापासून रॉकेल सामान्य ग्राहकाला मिळणे दुरापास्त झाले आहे. मुळात रॉकेलचा तूटपुंजा कोठा तालुक्याला पुरविला जातो आणि जिल्हा पुरवठा शाखा आपल्याच निर्णयाला हरताळ फासते.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे १ जुलैचे आदेश विचारात घेऊन रॉकेल वितरणाच्या परिमाणात बदल करण्यात आला. शहरी व ग्रामीण भागासाठी वाटपाचे वेगवेगळे असलेले प्रमाण रद्द करुन बिगर गॅसधारकांसाठी नवीन प्रमाण निश्चित करण्यात आले. शिधापत्रिकेवरील एका व्यक्तिला २ लीटर, तर २ व्यक्तिंना ३ लीटर, ३ व त्याहून अधिक व्यक्तिंसाठी ४ लीटर रॉकेल देण्याचे पत्र जिल्हा पुरवठा विभागाने २४ आॅगस्ट रोजी दुकानदारांना दिले. पण याच महिन्यात तालुक्याला केवळ २८ टक्के कोठाच दिला. मग हे प्रमाण दुकानदार राखणार कसे? असा प्रश्न आहे.
पुरवठा खाते पुरेसा कोठा देत नाही. त्यामुळे पुरेसे रॉकेल ग्राहकाला पुरविणे अवघड होते. मग दुकानदाराबरोबर वाद होतात. तक्रारी केल्या जातात व रॉकेलचा काळाबाजार केला जातो, असे बोलले जाते. दुकानदारांना जो तूटपुंजा साठा मिळतो, त्यातून दुकानदार काळाबाजार करतो. त्याशिवाय त्याला दुकान चालविणे अवघड असते. पण, ग्राहकांना रॉकेल न देताच काही दुकानदार काळा बाजार करतात. अशा दुकानदारांवर कोणी कारवाई करत नाही. रावतळे येथे काही महिन्यांपूर्वी निवासी नायब तहसीलदारांनी तलाठी नामक दुकानदाराला रंगेहात पकडले. त्याच्यावर कोणती कारवाई झाली, ते पुरवठा विभागाने आजअखेर सांगितले नाही. मुर्तवडे गावी कातळवाडीतील दुकानदाराने काळाबाजार केल्याची तक्रार उपसरपंच विजय नेवरेकर यांनी केली, त्याचे पुढे काय झाले, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
मुळात दुकानदारांना रॉकेलचा कोठाच तूटपुंजा दिल्यावर सामान्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. आतातर गॅस सिलिंडरधारकांना रॉकेल पुरवठा बंद झाल्याने चालू महिन्याचे रॉकेलचे नियतनही आले नाही. ऐन गणेशोत्सवाच्या काळात ग्राहकांना रॉकेल मिळणे अवघड होणार आहे. ग्रामीण भागात अजूनही रॉकेलचा वापर होत असल्याने महिलांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष घालून रॉकेल वाटपात सुसूत्रता आणावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)


अपुरा कोटा...
रॉकेल वाटपाबाबत तालुक्यात सर्वत्र बोंबाबोंब आहे. याला दुकानदार जबाबदार नाहीत. मुळात कोटाच पुरेसा उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांना रॉकेल देणार कसे? शिवाय काही वेळा कोटा अगदीच कमी येतो, त्याचे वाटप करणेही अवघड होते. याचा दुकानदाराला त्रास होतो. यामुळे ग्रामीण भागात नाहक गैरसमज होतात, वाद वाढतात. हे आता थांबायला हवे, असे जिल्हा रास्तदर धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अशोक कदम यांनी सांगितले.

Web Title: Due to the lack of kerosene in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.